नवी दिल्ली : भारत-चीन सैन्यामध्ये तणावाचे वातावरण सुरु आहे. दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये झालेल्या झडपेमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचे देखील ४० हून अधिक जवान मारले गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान देशभरात चीनविरोधात रोष आहे. चीनी मोबाईल एप, वस्तूंवर भारतीयांनी बहिष्कार टाकण्यास सुरुवात केलीय. दरम्यान भारतीय एथलिट्सनी देखील महत्वाचा निर्णय घेतलाय. या स्थितीमध्ये आयओए (IOA) देशाच्या बाजुने उभी राहीली आहे. यापुढे चीनी जाहीरातदारांशी कोणत्याही प्रकारचा संबध न ठेवण्याचा निर्णय इंडीयन ऑलम्पिक असोसिएशनने घेतलाय.
ऑलम्पिकमध्ये ‘ली निंग’ सारख्या चीनी प्रायोजकांवर बहिष्कार घालण्यात येत असल्याची माहिती आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी दिली. टोक्यो ऑलम्पिकपर्यंत ली निंगसोबत आमचा करार आहे. पण यावेळेस आयओए देशासोबत असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. चीनी जाहीरातदारांशी संबंध तोडण्याच्या निर्णयाला आयओए कोषाध्यक्ष आनंदेश्वर पांडे यांनी देखील पाठींबा दिलाय.
आयओए ने मे २०१८ मध्ये ली निंगसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यानुसार चीनी कंपनी भारतीय एथलीट्सना कीटची पूर्तता करते. याची किंमत ५ ते ६ कोटींच्या घरात आहे. भारत-चीनमध्ये सीमारेषेवरील वाढता तणाव पाहता नुकसान झाले तरी चालेल पण चीनी कंपन्यांशी संबंध ठेवायता नसल्याचे भारतातील अनेक कंपन्या, संस्था, नागरिकांनी ठरवलंय.
चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात व्यापारी वर्गाची मोठी मदत होणार आहे. अशा वस्तू आयात झाल्या नाहीत तर खरेदी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे डिसेंबर २०२१ पर्यंत चीनहून आयात होणाऱ्या वस्तूंमधून १.५ लाख कोटी रुपये कमी करण्याचा कॅटचा मानस आहे.
ज्या वस्तू भारतात आल्या नाहीत तरी काही फरक पडणार नाही अशा ३ हजार चीनी वस्तूंची यादी कॅटने बनवली आहे. या वस्तू भारतात पुर्वीपासून बनतायत. त्याच्या विक्रीवर भर देण्याचे आवाहन व्यापारी वर्गाला करण्यात येत असल्याचे कॅटचे राष्ट्रीय मंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगिले.
भारतीय व्यापाऱ्यांनी याचा संकल्प केला असून एका रात्रीत हे काम होणार नसल्याचेही ते म्हणाले.
Also Read- IIT गुवाहाटीने विकसित केले कोविड-19 साठीचे किफायतशीर तपासणीसंच