नागपुर : एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असलेला एमआयडीसी टेकचंदनगर येथील ७३ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपर्कात आलेली एक परिचारिका मंगळवारी पॉझिटिव्ह आली. तर मनपाचे आणखी दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह २४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या ५८३ वर पोहचली आहे.
विशेष म्हणजे, बजाजनगर येथील रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाळा तोंडावर असताना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या महिन्यात रुग्णांची संख्या उच्चांक गाठेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. यामुळे घराबाहेर पडताना मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन डॉक्टर करीत आहेत. धंतोली येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या वृद्धाचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. ३० मे रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांचे नमुने तपासण्यात आले. यात २४ वर्षीय परिचारिका पॉझिटिव्ह आली. ही परिचारिका बजाजनगर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे, नागपुरात पहिला रुग्ण बजाजनगरातील होता. आता पुन्हा वसाहतीतील रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णांची संख्या तीन झाली आहे.
सतरंजीपुरा झोनचे दोन कर्मचारी पॉझिटिव्ह
सतरंजीपुरा झोनमधील सोमवारी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला होता. यामुळे त्याचदिवशी या झोनअंतर्गत आरोग्य विभागातील चार डॉक्टर, तीन परिचारिका, हेल्थ वर्कर, डाटाएन्ट्री ऑपरेटर अशा ३७ लोकांचे नमुने आज मेयोमध्ये तपासण्यात आले. यात बिनाकी येथील एक महिला कर्मचारी तर सतरंजीपुरा झोनच्या समोर राहणारा एक पुरुष कर्मचारी पॉझिटिव्ह आला. यामुळे उर्वरित लोकांना होम क्वारंटाईन करणार की, कामावर बोलविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिमकी येथील १३ रुग्ण पॉझिटिव्ह
मोमिनपुरा, सतरंजीपुरानंतर टिमकी हे नवे हॉटस्पॉट ठरत आहे. आज या वसाहतीतून पुन्हा १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. वसाहतीतील रुग्णांची संख्या २६ झाली आहे. विशेष म्हणजे, आज पॉझिटिव्ह आलेल्या या रुग्णांमध्ये बहुसंख्य रुग्ण हे १४व्या दिवशी पॉझिटिव्ह आलेले आहेत.
लोकमान्यनगर, मोमिनपुरा, भानखेडा येथील दोन रुग्ण
लोकमान्यनगर, मोमिनपुरा, नाईक तलाव व भानखेडा वसाहतीतील प्रत्येकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर हंसापुरी व मोमिनपुरा येथून प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व रुग्ण क्वारंटईन होते. नीरीच्या प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आलेल्या दोन रुग्णांमधून ४४ वर्षीय महिला गुमगाव येथील तर दुसरा २६ वर्षीय पुरुष रुग्ण हा कोंढाळी येथील आहे.
सात महिन्याच्या गर्भवतीची कोरोनावर मात
मोमिनपुरा येथील सात महिन्याच्या गर्भवतीने कोरोनावर मात केली. मेयो रुग्णालयातून तिला आज सुटी देण्यात आली. मेडिकलमध्ये भरती असलेल्या आठ रुग्णांना सुटी देण्यात आली. यातील चारही पुरुष रुग्ण लक्ष्मीनगर येथील आहेत. तर उर्वरित एक गड्डीगोदाम, एक मोमिनपुरा तर दोन टिमकी येथील आहेत. यांना दहा दिवसानंतर लक्षणे नसल्याने सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ३९९ झाली आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित २०५
दैनिक तपासणी नमुने ५३९
दैनिक निगेटिव्ह नमुने ५२१
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५८३
नागपुरातील मृत्यू ११
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३९९
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २,७८४
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १,८६३
पीडित-५८३-दुरुस्त-३९९-मृत्यू-११
Also Read- सतरंजीपुरा येथील प्रतिबंधित क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा