मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करीत आहे. आज दुपारी निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण पट्टा आणि दमण, गुजरात परिसरात ताशी १२० किमी वेगाने वारे वाहत आहेत. तसेच, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत पावसाला सुरुवात झाली आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. तसेच, किनारपट्टीच्या विविध भागात एनडीआरएफच्या 20 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईत आठ, रायगडमध्ये पाच, पालघरमध्ये दोन, ठाण्यात दोन, रत्नागिरीत दोन आणि सिंधुदुर्गात एनडीआरएफची एक तुकडी तैनात असणार आहे. एनडीआरएफच्या एका रेस्क्यू टीममध्ये 45 जवानांचा समावेश आहे.
रत्नागिरीतील ३ तालुक्यात रात्रीपासून वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मंडणगड, गुहागर, दापोली तालुक्यास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यात 4 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अरबी समुद्रातील चक्रीवादळ पणजीपासून २८० किमी, मुंबईपासून ४३० किमी आणि सुरतपासून ६४० किमी अंतरावर होते. ताशी ११ किलोमीटर या वेगाने ते उत्तर-पूर्व दिशेकडे सरकत आहे. पुढच्या बारा तासांमध्ये याचा वेग आणखी वाढेल. आज दुपारी किंवा संध्याकाळी ते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातदरम्याचे हरिहरेश्वर, दमण आणि अलिबाग ओलांडेल. यावेळी येथे ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील आणि किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस पडेल.