अमरावती, दि. 31 : भारतीय रेल्वेतर्फे टप्प्याटप्प्याने रेल्वेगाड्या सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने जिल्ह्यात येणा-या प्रवाशांसाठी प्रमाणित कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली असून, त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
अमरावती जिल्ह्याकरिता अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी व भूसंपादन उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नोडल अधिकारी व तहसीलदार यांनी रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून रेल्वे वेळापत्रक तसेच जिल्हानिहाय प्रवाशांची यादी प्राप्त करावी. आगमनाची तारीख व वेळ आदी उल्लेखासह प्रवाशांची संपूर्ण यादी,संबंधित नोडल अधिकारी यांच्याकडे भारतीय रेल्वेने नियुक्त केलेल्या नोडल ऑफिसरने किमान एक दिवस अगोदर द्यावी जेणेकरून संबंधित एजन्सीद्वारे आवश्यक ती कार्यवाही करता येईल, प्रत्येक व्यक्तीचे ट्रेनच्या आधी अनिवार्यपणे स्क्रीनिंग केले जावे जेणेकरून फक्त निरोगी लोकच ट्रेनमध्ये चढू शकतील. रेल्वेस्थानकात सुव्यवस्था राखणे आणि सामाजिक अंतर राखण्याबाबतचे नियमांचे पालन करण्याची जबाबदारी रेल्वेची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी व संबंधित तहसीलदार (चांदूर रेल्वे स्टेशन, धामणगाव रेल्वे स्टेशन व इतर ग्रामीण भागातील रेल्वे स्टेशनांसाठी संबंधित तहसीलदार यांनी आणि अमरावती रेल्वे स्टेशन व बडनेरा रेल्वे स्टेशन तसेच मनपा क्षेत्रातील इतर रेल्वे स्टेशन करिता उपायुक्त अमरावती महानगरपालिका व अमरावती तहसीलदार) यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून सामाजिक अंतर राखण्यासाठी स्क्रीनिंग काऊंटरसह एक स्वतंत्र स्क्रीनिंग क्षेत्र स्थापित करावे. येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येनुसार स्क्रीनिंग काऊंटरची संख्या ठेवावी व आवश्यक फर्निचर ठेवावे. औषधी पथकासाठी आणि प्रवाशांसाठी काऊंटर ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रवाशांचे सुरक्षित पद्धतीने निर्गमन व्हावे. त्यामुळे स्क्रीनिंग करणाऱ्या विभागाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. रेल्वे स्थानकातून प्रवाशांचे स्क्रीनिंग आणि निर्गमन व्यवस्थित पद्धतीने होत असल्याचे रेल्वेने सुनिश्चित करावे. रेल्वे प्रशासनाद्वारे, स्क्रीनिंगकरिता प्रतीक्षेत असणाऱ्या प्रवाशांकरिता प्रतीक्षा कक्ष, प्रतिक्षा क्षेत्र तयार करण्यात यावे. जिल्हा आरोग्य अधिकारी व उपायुक्त महानगरपालिका अमरावती यांनी रेल्वे स्टेशनवर स्क्रिनिंगकरिता उशीर होऊ नये किंवा इतर अडचण आल्यास तपासणीसाठी पुरेसे वैद्यकीय पथक राहील याची खात्री करून घ्यावी. त्यांना सर्व आवश्यक वैद्यकीय साहित्य द्यावे. जिल्ह्यात येणाऱ्या सर्व नागरिकांना ते निरोगी असल्याची खात्री झाल्यानंतरच 14 दिवसांकरिता होम क्वारंटाईन करण्यात यावे. तसा शिक्का देखील मारण्यात यावा. लक्षण आढळल्यास इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करून पुढील तपासणी करण्यात यावी. ही जबाबदारी महानगरपालिका क्षेत्रामध्ये उपायुक्त महानगरपालिका अमरावती व ग्रामीण क्षेत्रांमध्ये तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहनचालकासह प्रवाशांसह खाजगी वाहनांना परवानगी आहे. प्रवाशाकडे वाहन चालकासह ई-तिकीट अनिवार्य असेल. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी संबंधित टॅक्सी असोसिएशनची सल्लामसलत करून रोस्टरनुसार टॅक्सी सेवेची व्यवस्था करावी. योग्य निर्जंतुकीकरण, सामाजिक अंतर ठेवणे व इतर नियम अनिवार्य आहे. कोणतीही अडचण येऊ नये म्हणून स्थानिक पोलीस आणि जीआरपी कर्मचारी पुरेसे तैनात करावे, आदी निर्देश देण्यात आले आहेत.
Also Read- नागपुरातील वसंतनगर, काशीनगर परिसर सील