नागपूर : विदर्भात उष्णेतेची लाट आली आहे. आधीच उकाड्याने हैराण झालेल्यांना उष्णतेच्या लाटेने बेजार केले आहे. अमरावती जिल्हात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. तिवसा तालुक्यातील डेहनी शेतशिवारात एका ५८ वर्षीय गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तिवसा ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे आता देशात उष्णेच्या लाटेमुळे काही भागत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव होत आहे. अशातच एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे उन्हाचा तडाखा यामुळे विदर्भातील लोक हैराण झाले आहेत. विदर्भात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील शहरांचे तापमान वाढत चालले आहे. तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मागिल तीन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर अकोला येथे विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. अमरावतीत उन्हाचा कहर दिसून येत आहे. लोकांनी कोरोना आणि उन्ह्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी बाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस हवामानात कोणताच बदल दिसणार नाही, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि मध्य प्रदेश येथे उष्णतेची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे.
Also Read- CoronaVirus in Nagpur : नागपुरात १३ पॉझिटिव्ह,एक मृत्यू : मृत्यूची संख्या ९