नागपूर, ता. १४ : कोरोनाच्या संकटात कुणीही उपाशी राहू नये यासाठी मनपाच्या सेवा कार्याला अनेकांची साथ मिळत आहे. कुणी ‘कम्युनिटी किचन’मधून जेवण पुरवित आहे तर कुणी जेवणाची सामुग्री पुरवून मनपाचे हात बळकट करत आहेत. या सेवा कार्याला आता क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनीही सहकार्य दर्शविले आहे. १३०० किमीची सलग ४८ तास इनडोअर सायकलिंग करून डॉ.अमित समर्थ यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून प्राप्त झालेले दोन लाख रुपये सेवा कार्यासाठी दिले आहेत. यामधील निधीचा धनादेश त्यांनी गुरूवारी (ता.१४) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगरसेविका डॉ.परिणीता फुके, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा.संजय भेंडे, सचिव प्रा. प्रमोद पेंडके प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रो-हेल्थ फाऊंडेशनचे संस्थापक आणि माईल्स एन माईलर्स एड्युरन्स स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ.अमित समर्थ मनपाच्या स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसॅडर आहेत. जगातील अनेक कठीण शर्यत पूर्ण करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. कोरोनाच्या संकटकाळातही त्यांनी आपल्या विक्रमी कामगिरीद्वारे साथ दिली आहे. डॉ. समर्थ यांनी ४८ तास ‘नॉनस्टॉप’ इनडोअर सायकल चालवून १३०० किमी अंतर पूर्ण केले. घरीच ‘ट्रेनर’ आणि ‘ॲप’च्या माध्यमातून ‘व्हर्च्यूअल’ पद्धतीचा उपयोग करून त्यांनी सायकल चालविली. त्यांच्या या इव्हेन्टचे फेसबुक लाइव्ह करण्यात आले. यावेळी त्यांनी कोरोनाबाबत जनजागृतीचा संदेशही दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याकडे दोन लाख रुपयांचा निधी जमा झाला. या निधीपैकी काही भाग त्यांनी महाराष्ट्र पोलिसांतर्फे करण्यात येत असलेल्या सेवा कार्याला दिला. मनपाच्या सेवा कार्यालाही सहकार्य करण्याची इच्छा त्यांनी नगरसेविका डॉ.परिणीता फुके यांच्याकडे व्यक्त केली व त्यांच्या माध्यमातून त्यांनी उर्वरित रक्कम मनपाच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या ‘कम्युनिटी किचन’साठी दिली आहे. डॉ. अमित समर्थ यांनी मैत्री परिवार, सीएजी आणि मल्हार फाउंडेशनला त्यांनी या माध्यमातून मदत केली.
मैत्री परिवाराच्या माध्यमातून दररोज पाच हजारावर ‘फूड पॅकेट्स’चे वितरण
लॉकडाउनमध्ये नागपूर शहरात कुणीही उपाशी राहू नये यासाठी गरजू, बेघरांना अन्नपुरवठ्यासाठी मनपाने पुढाकार घेताच शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्याला सहकार्य दर्शविले. मनपाच्या सहकार्याने शहरात २७ ‘कम्युनिटी किचन’ सुरू आहेत. तर ५०च्या वर स्वयंसेवी संस्था, सेवाभावी लोक नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी कार्य करत आहेत. या सर्व कार्यामध्ये मैत्री परिवार संस्थेने घेतलेले सेवा कार्याचे व्रत आजही अविरत सुरू आहे. सर्वसामान्य, गरीब, गरजू, बेघर, निराधारांच्या मदतीसाठी संस्थेने मैत्रीचा सेतू निर्माण केला आहे.
शहरात लॉकडाउन जाहीर होताच २७ मार्चपासून मैत्री परिवार संस्थेद्वारे दररोज गरजूंपर्यंत जेवणाचे डबे पोहोचविले जात आहेत. सुरूवातीला संस्थेच्या सुरेंद्रनगर येथील छात्रावासातून हे डबे पुरविण्यात येत होते. मात्र गरजूंची वाढती संख्या लक्षात घेता कुणीही उपाशी राहू नये या हेतूने धरमपेठ येथील वझलवार लॉन येथेही एक किचन सुरू करण्यात आली. त्यानंतर अत्रे लेआउटमधील राजेश्वरी मंदिर परिसरात तिसरे किचन सुरू करण्यात आले. सुरूवातीला सुरेंद्रनगर आणि वझलवार लॉन येथील किचनमधून प्रत्येकी एक हजार तर अत्रे लेआउटमधील किचनमधून पाचशे जेवणाचे डबे तयार करून वितरीत करण्यात येत होते. आज वाढत्या गरजेनुसार ही संख्या दररोज वाढतच आहे. आजघडीला आजघडीला दररोज पाच हजारावर ‘फूड पॅकेट्स’चे वितरण केले जात आहे. या अखंड सेवाकार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रा.प्रमोद पेंडके यांच्यासह संपूर्ण चमू अहोरात्र कार्य करीत आहे. मैत्री परिवार संस्थेच्या या उपक्रमामध्ये दोनशेच्या वर स्वयंसेवक सेवा देत आहेत.
Also Read- लॉकडाउन संदर्भातील नव्या आदेशाचे पुनर्विलोकन करून सुधारणा करा