वर्धा: मागील सात दिवसांत सुमारे २५० नागरिकांनी ‘रेड झोन’मधून वर्धा जिल्ह्यात प्रवेश केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्यसेवक आणि आशा वर्करकडून या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. आजवर करोनामुक्त राहिलेल्या वर्धा जिल्ह्यासमोर या निमित्ताने नवे आव्हान निर्माण झाले आहे. सीमेवरील सुरक्षा अधिक कठोर करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
वर्धा जिल्ह्यात अद्याप एकही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये कायम ठेवण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. सीमा सील करण्यात आल्या आहेत. तरीही नागपूर, यवतमाळमधून काही लोक जिल्ह्यात दाखल होत असल्याचे दिसून आले आहे. चार दिवसांपूर्वी अॅम्ब्युलन्समधून नागपुरातील हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा भागातील एक महिला पुलगावात पोहचली. याविषयीची माहिती होताच अॅम्ब्युलन्स चालक, मालक, सदर महिला आणि तिच्या नातेवाइकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना देवळीच्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. रुग्ण घेऊन गेल्यानंतर परत प्रवासी घेऊन येणाऱ्या दोन अॅम्ब्युलन्स जप्त करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर कांद्याच्या ट्रकचा आसरा घेत अनेकांनी वर्धा गाठले आहे. एकट्या पुलगावमध्ये एका दिवसात विविध जिल्ह्यांमधून आलेल्यांविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आर्वी, तळेगाव, सेलडोह, पुलगाव, कारंजा ही इतर जिल्ह्यांना जोडणारी सीमेवरची गावे आहेत. या गावच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. तरीही गावखेड्यातून प्रवेश करण्यासाठी अनेक आडवाटा अजूनही शिल्लक आहेत. त्यामुळे मोटारसायकल, पायी लोक येत आहेत. परजिल्ह्यातून आलेल्यांना ‘होम क्वारंटाइन’ केले जाते. अजूनही यांच्या संख्येत घट झालेली नाही. त्यामुळे आता बाहेरून येणाऱ्यांना थेट आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी दिली. जिल्हा प्रशासनानेही बाहेरून याल तर खबरदार म्हणत तंबी दिली आहे. यवतमाळ, नागपूर आणि अमरावती या तिन्ही लगतच्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढू लागल्याने वर्धा जिल्ह्यासमोर आव्हान अधिक तगडे झाले आहे.
७० अॅम्ब्युलन्स मालकांना नोटीस
अॅम्ब्युलन्समधून परजिल्ह्यांतून प्रवासी आणले जात असल्याचे उघड होताच सुमारे ७० अॅम्ब्युलन्स मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. प्रवासी वाहतूक कराल तर याद राखा, अशी थेट तंबीही त्यांना देण्यात आली आहे. विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या अॅम्ब्युलन्सवरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. अप-डाऊन करणाऱ्या ६९ कर्मचाऱ्यांवरही यापूर्वी कारवाई करण्यात आली.
वर्धा जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न सीमेवर होत आहे. पोलिस प्रशासनाने अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. अॅम्ब्युलन्स, कांद्याच्या ट्रकचा आसरा प्रवासासाठी घेतला जात असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष आहे.
रवींद्र गायकवाड,
पोलिस निरीक्षक, पुलगाव