नागपूर: कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर नागपुरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सारेच जण घरात आहे. अनेकांच्या हाताला काम नाही. आर्थिक चणचण भास आहे. अनेकांचे परिवार अन्य ठिकाणी अडकले आहेत. या आणि अशा अनेक कारणांमुळे मानसिक त्रास होत असलेल्या आणि नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या नागरिकांसाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सात दिवसांपूर्वी समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत ४४६ व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले आहे.
समुपदेशनाची सेवा सुरु केल्यानंतर अनेकांनी हेल्पलाईन क्रमांकावर दूरध्वनी करून समुपदेशाची विनंती केली. त्यानुसार चिंता दोष, ताणतणाव, नैराश्य, भ्रमनिरास, मनोशारीरिक दोष, भावनिक असंतुलन आदी दोषांसाठी नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर एका व्यक्तीचे समुपदेशन करण्यात आले.
लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक समुपदेशन
समुपदेशनासाठी हेल्पलाईन क्रमांक नागपूर महानगरपालिकेने जाहीर केल्यानंतर सर्वाधिक समुपदेशन लक्ष्मीनगर झोनअंतर्गत वास्तव्यास असलेल्या व्यक्तींचे करण्यात आले. तेथे १७८ व्यक्तींचे समुपदेशन प्रगतीपथावर आहे. धरमपेठ झोनअंतर्गत ८४ व्यक्तींचे समुपदेशन प्रगतीपथावर आहे. हनुमाननगर झोनमध्ये ४० व्यक्तींचे, धंतोली झोनमध्ये १०७ व्यक्तींचे तर मंगळवारी झोनमध्ये ३७ व्यक्तींचे समुपदेशन प्रगतीपथावर आहे. समुपदेशन करणाऱ्या व्यक्तींमध्ये ताणतणाव असलेले व्यक्ती सर्वाधिक असल्याचे आढळून आले. आतापर्यंत ताणतणावात असलेल्या ६६ व्यक्तींचे समुपदेशन प्रगतीपथावर आहे. चिंता दोष असलेल्या ४९ व्यक्तींचे समुपदेशन प्रगतीपथावर आहे.
समुपदेशनासाठी करा कॉल
कोव्हिड संदर्भातील भीती आणि अन्य शंका असतील तर समुपदेशनासाठी नागपूर महानगरपालिका नियंत्रण कक्षात दूरध्वनी करावा. ०७१२-२५६७०२१, ०७१२-२५६२४७४ ०७१२-२५६१८६६ या क्रमांकावर दूरध्वनी करून समुपदेशन सेवेचा लाभ घेता येईल.
Also Read- Corona crisis: What is the situation in these countries around the world?