नागपूर: मागील आठवड्यापासून शहरात कोरोनाबाधितांची संख्या दर दिवसाला वाढत आहे. 12 ते 14 एप्रिल या तीन दिवसांत 30 कोरोनाबाधितांची नोंद झाली. यामुळे शहर डेंजर झोनमध्ये आले. मात्र आजचा दिवस नागपुरकरांना दिलासा देणारा ठरला. मेयो, एम्स आणि पशुवैद्यक प्रयोगशाळेत एकही कोरोना बाधित आढळला नाही. यामुळे प्रशासनानेही समाधान व्यक्त केले.
नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या 56 झाली. यामुळे समुहात प्रादुर्भावाची भिती व्यक्त करीत आरोग्य विभाग हादरला होता. परंतु मध्येच मरकजशी संबधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रशासन दहशतीमध्ये आले. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील सर्व मरकजशी संबधित रुग्णांना सक्तीचे विलगीकरण केले. ही समाधानाची बाब ठरली. आरोग्य विभागाने मरकज आणि दिल्लीशी संबंधित व्यक्तींची यादी मिळताच जोखमीतील आणि कमी जोखमीतील व्यक्तींचा तातडीने शोध घेतला. त्यांना सक्तीने आमदार निवास, रवी भवन, लोणारा, वनामतीसह सिंबॉयसिस येथे विलगीकरणात ठेवण्यात आले. 14 दिवसांच्या विलगीकरणात पुढे हे बाधित झाले.
मागील 14 दिवस हे व्यक्ती समाजात मिसळले असते तर मात्र नागपुरामध्ये कोरोनाची संख्या प्रचंड वाढली असती. या व्यक्तींच्या फिरण्यावर मर्यादा आल्याने विलगीकरणातीलच व्यक्तीचे अहवाल सकारात्मक निघाले. त्यांचा संपर्क टाळला गेल्याचे समाधान महापालिका आयुक्तांच्या दुरदृष्टीमुळे टळले. बुधवारी मेयो, एम्स आणि पशुवैद्यक प्रयोगशाळेत सुमारे अडिचशेवर कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून एकही कोरोनाबाधित आढळला नाही. एम्सच्या चाचणीत यवतमाळ येथील एक जण बाधित आढळला आहे.
नऊ कोरोना संशयित दाखल
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) रुग्णालयांतील कोरोना बाह्यरुग्ण विभागात तपासण्यात आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे आढळून आलेल्या नऊ जणांना दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. अहवाल आल्यावरच त्यांच्या आजाराची नेमकी माहिती मिळेल. मेयोच्या कोरोनासंबंधित बाह्यरुग्ण विभागात 95 तर मेयोच्या बाह्यरुग्ण विभागात 50 जणांची तपासणी केली गेली.