नागपूर: कोरोना विषाणूच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अतितीव्र आजाराने ग्रस्त असलेल्या वयोवृद्ध व्यक्ती, कुटुंबात कोणाचाही आधार नसलेले एकाकी राहणारे दिव्यांग व्यक्तींसाठी नागपूर महानगरपालिकेने हेल्पलाईन सुरू केली आहे. अशा व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्यास त्यांनी सदर हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन मनपाच्या समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
लॉकडाऊनदरम्यान जिव्हाळा फाऊंडेशनची जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना मदत
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. अतितीव्र आजाराने ग्रस्त असलेल्या वयोवृद्ध व्यक्ती, कुटुंबात कोणाचाही आधार नसलेल्या एकाकी दिव्यांग व्यक्तींना लॉकडाऊन परिस्थितीत घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित गरजू व्यक्तीने हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ही सेवा उपलब्ध होऊ शकेल.
मनपाने सुरू केलेल्या या हेल्पलाईनचा क्रमांक ०७१२-२५६७०१९ असा असून संपर्क अधिकारी (नोडल ऑफिसर) म्हणून अभिजीत राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रनिहाय समाजसेवी संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. अन्नधान्य, औषधे, भाजीपाला, दूध आदी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या संस्था या स्वयंसेवी संस्थांशी जोडण्यात आल्या आहेत.
इच्छुक असलेल्या स्वयंसेवी संस्था/दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांनी या प्रक्रियेत सहभाग घेण्याची इच्छा दर्शविल्यास हेल्पलाईन संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
हेल्पलाईनवर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने स्वयंसेवी संस्था वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सहकार्य करतील. सदर हेल्पलाईन क्रमांक सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहील.
Also Read- नागरिकांच्या सोयीसाठी मनपाने तयार केले वेब ॲप्लिकेशन