नवी दिल्ली : देशभरात लॉक डाऊन सुरु असून आणखी २० दिवस अशीच स्थिती राहणार आहे. या कठिण परिस्थितीत शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. पंतप्रधान किसान (PM KISAN) योजनेत सरकारने १५००० कोटी मंजूर केले आहेत. लवकरच टप्याटप्याने ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. जवळपास साडेसात कोटी शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशभर २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषीत केला आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र शेतकरी बांधवांना शेतमाल नेण्यासाठी अनके अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत दोन हजारांची मदत शेतकऱ्यांना थोडीफार दिलासा देणारी ठरणार आहे.
येत्या १ एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केले जाणार आहे. पीएम किसान (PM KISAN) योजनेत तीन टप्प्यात शेतकऱ्यांना सहा हजारांची मदत केली जाणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून ती संबंधित राज्य सरकारांना पाठवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. १ एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजारांचा पहिला हप्ता जमा करण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
पीएम किसान (PM KISAN) योजनेत डिसेंबर २०१९ पासून ८ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांना ५४ हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. देशभरातून जवळपास १० कोटी शेतकऱ्यांची माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. यात राज्यनिहाय शेतकरी आणि आधार जोडणी यांची छाननी केली जात असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.