नागपूर, ता. २४: ‘कोरोना’ प्रतिबंधाच्यादृष्टीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रत्येकाने नियमाचे पालन करावे. कुणीही घराबाहेर पडू नये. ‘कोरोना’ संदर्भात माहिती आणि तक्रारीसाठी मनपा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय पाणी पुरवठा आणि मलनि:सारणाच्या तक्रारींसाठीही हेल्प लाईन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना सुविधा प्रदान करण्यास महानगरपालिका तत्पर आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून घरीच राहावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
मनपाद्वारे ‘कोरोना‘ संदर्भात सुरू करण्यात आलेले नियंत्रण कक्ष व पाणी पुरवठा आणि मलनिःसारण सुविधेबाबच्या हेल्प लाईनलाईनची मंगळवारी (ता.२४) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाहणी केली व संपूर्ण यंत्रणेच्या कार्याचा आढावा घेतला.
शहरात संचारबंदी लागू असल्याने अत्यावश्यक गोष्टींसाठीच घरातील कोणत्याही एका सदस्याला घराबाहेर पडण्याची मुभा आहे. भाजी, किराणा, औषध या अत्यावश्यक गोष्टींची खरेदी करताना संसर्ग टाळण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये किमान पाच फुटाचे अंतर राखावे. ‘कोरोना’च्या प्रतिबंधासाठी या सर्व गोष्टींचे पालन करावे. नागरिकांची कोणत्याही प्रकारे असुविधा होऊनये यासाठी मनपामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षामध्ये आधी एकच संपर्क क्रमांक होता आता आणखी एक असे दोन संपर्क क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांनी मनपाच्या नियंत्रण कक्षाशी ०७१२ २५६७०२१ आणि ०७१२ २५५१८६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
याशिवाय पाणी पुरवठा आणि मलनिःसारण या अत्यावश्यक सेवांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. सोमवार (ता.२३)पासून सुरू करण्यात आलेल्या या हेल्पलाईनवर पाणी पुरवठ्याबाबत सुमारे १५ तर मलनिःसारण संदर्भात १२ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी काही तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत तर काहींवर काम सुरू आहे. पाणी पुरवठा आणि मलनिःसारण सुविधेसाठी नागरिकांनी ०७१२ २५३२४७४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
नियंत्रण कक्ष सुरू केल्यापासून अर्थात १३ मार्चपासून आजपर्यंत १०११ नागरिकांनी कोरोनासंदर्भात माहिती विचारली. मंगळवारी (ता.२४) सकाळी ८ ते दुपार २ वाजतापर्यंत ५७ नागरिकांनी फोन करून माहिती घेतली, तक्रारी केल्या. नियंत्रण कक्षात माहिती देण्यासाठी एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका आणि दोन कर्मचारी नागरिकांना माहिती देत आहेत.
कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास मनपा तत्पर आहे. मनपातर्फे ‘इमर्जेंसी ट्रान्सपोर्टेशन प्लान’ संदर्भात कार्य सुरू आहे. नागरिकांनी सहकार्य करावे हीच अपेक्षा आहे. ३१ मार्च पर्यंत कुणीही घराबाहेर पडू नये. आवश्यक माहितीसाठी मनपाशी संपर्क साधावा, असेही आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
Also Read- रस्त्यांवरील बांधकाम साहित्य तातडीने उचलण्याचे आदेश