नागपूर- आम आदमी पक्षाने दिल्लीत भाजपचा दणदणीत पराभव केल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तब्बल पाच वर्षांनी जल्लोष करण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळाली. या विजयामुळे विश्वास उंचावलेल्या नेत्यांनी नागपूर महापालिकेवर आपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आहे.
‘आप’ ला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चमक दाखवता आली नाही. मात्र दिल्लीतील विजयाने महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते सज्ज झाल्याचे निकालानंतर केलेल्या ‘रोड शो’ वरून दिसून आले. ‘आप’ ला घवघवीत यश मिळाल्याचा निकाल जाहीर होताच सिव्हिल लाइन्समधील पक्ष कार्यालयात मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. व्हरायटी चौक, महालपर्यंत ही मिरवणूक काढून दिल्लीतील विजयाकडे जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘आप’ चे संयोजक देवेंद्र वानखडे, जगजितसिंह आदींनी मिरवणुकीचे नेतृत्व केले.
अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर देशाची राजधानी दिल्लीला विकासाचे मॉडेल म्हणून समोर आणले. शाळांचा दर्जा सुधारण्याचे वचन ‘आप’ ने पूर्ण केले. महिला सुरक्षेवर भर दिला. सीसीटीव्ही लावले, ग्राहकांना भुर्दंड बसणार नाही, यासाठी मोफत वीज दिली. अन्य राज्यांनीही दिल्लीचे अनुकरण सुरू केले. तेथेही मोफत वीज देण्याचा विचार करण्यात येत आहे. राजधानीत बदल होऊ शकतो तर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात का नाही. नागपुरातही ‘आप’ हे शक्य करू शकते.
महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपने शहराचे वाटोळे केले आहे. शहरातील ४५० अधिक शाळांपैकी निम्म्याहून अधिक बंद पडल्या आहेत. महापालिकेच्या दीडशे रुग्णालयात सोयींचा अभाव आहे. डॉक्टर्स नाहीत. शहर बस सेवा खासगी कंपनीला दिली. त्यातून उत्पन्न येण्याऐवजी महापालिकेला फटका बसतो. पाणी पुरवठ्याचे खासगीकरणाचा शहरवासियांना लाभ नाही. उन्हाळ्यात भीषण टंचाईला सामोरे जावे लागले. जातीय तेढ निर्माण करून राजकारण करण्याचे काम भाजप करत आहे. महापालिकेत सत्ता आणून शहराचा चेहरामोहरा बदलवणार, असा विश्वास ‘आप’ चे संयोजक वानखडे यांनी व्यक्त केला.
देशातील बड्या नेत्यांना जनतेने यापूर्वी खाली खेचले आहे. त्यामुळे भाजपची सत्ता जाईल आणि ‘आप’ ची सत्ता येईल. विकास हेच आमचे ध्येय असून महापालिका निवडणुकीसाठी आमची तयारी सुरू झाली आहे, असेही वानखडे म्हणाले. ‘आप’ ने सुरुवातीपासून वेगळ्या विदर्भाला पाठिंबा दिला आहे. छोट्या राज्याने विकास शक्य असल्याचे सिद्ध झाले आहे. वेगळे राज्य झाल्यास विदर्भाचे चित्र बदलेले. त्यामुळे वेगळ्या राज्यासाठी आमची भूमिका आक्रमक राहील, असेही वानखडे यांनी सांगितले. येत्या काळात संघटन बळकट करण्यासाठी अबंरीश सावरकर, अशोक मिश्रा, कविता सिंघल, गीता कुहीकर, शंकर इंगोले, भूषण ढाकुलकर, अॅड. राजेश भोयर, पीयूष आकरे, कृतल वेलेकर, अजय धरमे, प्रशांत निलाटकर यांच्यासह पक्षाचे अन्य नेते व कार्यकर्ते तयारी लागले आहेत.