वर्धा: ‘बालनाट्य निर्मिती हे सर्वात कठीण काम आहे तर बालक हा जगातील सर्वात कठीण प्रेक्षक आहे’, असे उद्गार अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी वर्धा येथे गुरुवारी आयोजित सहाव्या विदर्भस्तरीय बालसाहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी काढले. ‘लहान मुलांना गोष्टी ऐकायला आणि सांगायलाही आवडतात. बालकांचे हे ऐकणे आणि सांगणे जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत बालसाहित्य निर्मिती होतच राहील. ‘भाषा ही पहिले घरात, मग शाळेत आणि नंतर जगात बोलली जाते. मुलांना उत्तम मराठी यावी, यासाठी शाळेवर विसंबून न राहता स्वतःच्या घरापासून सुरुवात करा’, असेही ते म्हणाले. विदर्भ साहित्य संघ आणि स्कूल ऑफ स्कॉलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीवर्षानिमित्त दत्ता मेघे सभागृहात आयोजित या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
स्थानिक विनोबा भावे व्यासपीठावर आयोजित या उद्घाटन सोहळ्याला संमेलनाध्यक्ष चंद्रकांत चन्ने यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले, वि. सा. संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग, स्वागताध्यक्ष आभा मेघे, संमेलन संयोजक संजय इंगळे तिगावकर, निमंत्रक शुभदा फडणवीस, केंद्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस विलास मानेकर, शाखा समन्वय सचिव प्रदीप दाते, अ.भा. साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. गजानन नारे, आयोजन समिती सदस्य प्राचार्य आरती चैबे, डॉ. राजेंद्र मुंढे, रंजना दाते, डॉ. गजानन कोटेवार, प्रा. शेख हाशम, प्रा. पद्माकर बाविस्कर, डॉ. स्मिता वानखेडे, मीनल रोहणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. सुनीता कावळे, हरीश इथापे, सचिन सावरकर, मोहित सहारे यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी सकाळी वर्धानगरीतून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत लोक विद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय, केसरीमल कन्या शाळा, विकास विद्यालय, जगजीवनराम विद्यालय, स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या या शाळांमधील विविध वेशभूषांमध्ये सजलेल्या व हाती ग्रंथ घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग होता.
दिंडीतील पालखीत भारताचे संविधान व सत्याचे प्रयोग हे ग्रंथ ठेवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करीत गांधी पुतळ्याजवळ या दिंडीची सांगता झाली.
‘लहान मुलांचे बोलणे ही एक स्वतंत्र बोली असते आणि त्याचे आकलन साहित्याला नाही. त्यांच्या कल्पनांचे एक स्वतंत्र साम्राज्य असते. बालकांच्या कल्पनाशक्तीची अनुभूती मोठ्यांना येईल, तो दिवस निश्चितच महत्त्वाचा आहे. त्यासाठी मुलांना वाचण्याची क्षमता आपल्यात विकसित करावी लागेल, असे उद्गार सहाव्या विदर्भस्तरीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत चन्ने यांनी काढले.