मुंबई : मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. राऊतांना लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केले. रविवारी संजय राऊतांना छातीत दुखू लागल्यामुळे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी देखील करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. हॉस्पिटलमध्ये विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेतली.
दरम्यान, थोड्याच वेळेपूर्वी शिवसेना – काँग्रेसची बैठक पार पडली. ‘हॉटेल ट्रायडन्ट’मध्ये पार पडलेल्या या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी धावता संवाद साधला. यावेळी, चर्चा योग्य दिशेनं सुरू असल्याचं सूतोवाच त्यांनी केलं.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांना मुंबईतल्या चव्हाण सेंटरमध्ये मार्गदर्शन केलं. मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, चिंता करू नका. आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही अशा शब्दांत त्यांनी आमदारांना आश्वस्त केलं. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे चिंता करायची गरज नसल्याचंही त्यांनी आमदारांना सांगितलं