नवी दिल्ली: महाराष्ट्रात अखेर तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीच्या फाइलवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अखेर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आजपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागू असली तरी एखाद्या पक्षाने पुरेसे संख्याबळ दाखवल्यास त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवली जाईल, असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे. भाजपनंतर शिवसेनाही राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करू शकली नव्हती. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेस पाचारण केलं होतं. पण राष्ट्रवादीनेही सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दर्शवल्याने राज्यपालांनी केंद्राकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या शिफारशीची फाइल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविले. कोविंद यांनी संध्याकाळी साडेपाच नंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या आदेशावर सही केल्याने महाराष्ट्रात राजष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
राज्यपालांची सुरक्षा वाढवली
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने महाराष्ट्राची सर्व सूत्रे राज्यपाल कोश्यारी यांच्या हातात आली आहेत. त्यामुळे कोश्यारी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून राजभवनाबाहेरील सुरक्षेचा ताफाही वाढवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट
महाराष्ट्राच्या इतिहासात दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागली असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही तिसरी वेळ आहे. या आधी १९७८ आणि २०१४ मध्ये महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीखाली गेलं होतं. १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचं सरकार होतं. हे सरकार बरखास्त करून तेव्हा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे १७ फेब्रुवारी ते ९ जून १९८० या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर २०१४ मध्येही महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीखाली गेलं. ही राष्ट्रपती राजवट ३२ दिवसांसाठी होती. राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळलं होतं व त्यानंतर २८ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ यादरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.