मुंबई: शिवसेनेला शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसकडून पाठिंब्याचं पत्र मिळालं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा सेनेला करता आला नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र निवडणुका लढल्याने पाठिंब्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी मिळूनच घ्यायचा आहे. स्थिर सरकार स्थापन करण्याची गरज आहे. पण एकट्या राष्ट्रवादीने निर्णय घेऊन काही होणार नाही.
अजित पवार यांनी सांगितलं की, काँग्रेसकडून मिळणाऱ्या पाठिंब्याची पत्राची सकाळी दहा पासून संध्याकाली साडेसात पर्यंत सर्वच नेते वाट बघत होते. मात्र पत्र मिळालं नाही. काँग्रेसकडून सकाळी ते मिळेल असं सांगण्यात आलं होतं . त्यानंतर दुपारी मिळेल असं कळवलं. पण शेवटी थोडा वेळ लागेल असं सांगितलं अखेर पोहोचलंच नाही. तसंच राष्ट्रपती राजवट लागली तरी काही होत नाही , मॅजिक फिगर जुळली की पुन्हा सत्तेवर येऊ शकतो जरा सबुरीने घ्या असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
सध्या काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये आहेत. वरिष्ठ नेते दिल्लीत असल्यानं चर्चेत अडचणी येत असल्याचं अजित पवार म्हणाले. आम्ही एकटे काही करू शकत नाही. उद्या सरकार स्थापन करायचं असेल तर काँग्रेससोबत चर्चा केल्याशिवाय आम्हाला कोणताही निर्णय़ घेता येत नाही असंही अजित पवार यांनी सांगितलं.
वेळेअभावी बैठक कोणत्या ठिकाणी घ्यायची हेदेखील महत्त्वाचे आहे. सध्या दिल्लीत ही बैठक घेणं शक्य नाही. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ कमी आहे. त्या वेळेत दिल्लीत जाऊन चर्चा करणं आणि पुन्हा इथं येऊन पुढची वाटचाल करणं कठिण असल्याचं अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले अजित पवार?
-आम्ही विरोधी पक्षातच बसू असं याआधीच सांगितलं आहे.
-भाजप-सेनेचं बिनसलं आणि त्यांच्यात मार्ग निघाला नाही. शेवटी सेनेने वेगळी भूमिका घेतली.
-आता फक्त आम्ही कोणताही निर्णय घेतला तरी सरकार स्थापन होऊ शकत नाही. आमच्यासोबत काँग्रेस आली तरच मार्ग निघू शकतो.
-काँग्रेसनं इथं येणं गरजेचं आणि आमच्याशी चर्चा करायला हवी. आमदार जयपूरमध्ये आणि नेते दिल्लीत ते इथं पोहचल्यावर चर्चा शक्य आहे.
-राज्यपालांनी सर्व आमदारांच्या सह्या असलेलं पत्र मागितलं आहे. ही विचित्र अट पूर्ण कऱणं अवघड आहे.
-स्थिर सरकार हवं असेल तर तिघांनी एकत्र होऊन आणि त्यात एकवाक्यता असेल तरच शक्य आहे.
-आघाडीमध्ये समजुतदारपणा होता. मात्र आम्ही सेनेसोबत कधीच सरकार चालवलेलं नाही त्यामुळे अनेक प्रश्न आहेत.
आम्ही याबाबत विचार केला आहे पण काँग्रेसनेही विचार केला पाहिजे. आज आम्ही चर्चा करू आणि आमच्यात काही ठरलं तर पुढचा निर्णय घेऊ.
दरम्यान, सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. त्याआधी शरद पवार आणि सुप्रिया सुळे सेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रुग्णालयात गेले आहेत. त्यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.