नागपूर: सरकार आल्यानंतर १० रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची खिल्ली उडवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही तुमच्या पुतण्याला आवरा. धरणं भरण्यापेक्षा स्वयंपाक केलेला कधीही बरा, असं उद्धव ठाकरे परांडा येथील प्रचारसभेत म्हणाले.
पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर गोरगरिब जनतेला १० रुपयांत जेवणाची थाळी देऊ असं आश्वासन देणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शरद पवार यांनी बार्शी येथील सभेत निशाणा साधला होता. शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली ते कळलंच नाही आणि ते आता थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य चालवायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे, असा टोला पवार यांनी लगावला होता. पवारांच्या या टोल्याला उद्धव ठाकरे यांनी परांडा येथील सभेत प्रतिटोला लगावला आहे. शरद पवार, तुम्ही पुतण्याचा आवरा. धरणं भरण्यापेक्षा स्वयंपाक केलेला कधीही बरा, असं ते म्हणाले. यावेळी अजित पवारांनाही त्यांनी लक्ष्य केलं. अजित पवारांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. दुष्काळाच्या वेळेला तुमचे अश्रू कुठे होते? दगडाला सुद्धा पाझर फुटतो ऐकलं होतं. त्यामुळं अजित पवार यांना सुद्धा अश्रू फुटतात हे कळल्यावर बरे वाटले, असा टोला त्यांनी हाणला.
‘स्वयंपाकासाठी तुमच्या धरणातलं पाणी नको’
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोलापुरातील बार्शीमध्येही प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. जनतेसाठी स्वयंपाक करायचा आहे. पण त्या स्वयंपाकासाठी तुमच्या धरणातील पाणी नको, अशा शब्दांत त्यांनी पवारांची खिल्ली उडवली.
उद्धव यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:
>> जिथे मनापासून लोकं एकत्र येतात, तिथे यश नक्कीच मिळते.
>> तुमच्यासारखे शिवसैनिक माझ्यावर प्रेम करतात; म्हणून मी शिवसेना पक्षप्रमुख आहे.
>> जसं शेतकऱ्याला मी सातबारा कोरा करण्याचे वचन दिलं आहे, ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.
>> मी तुम्हाला तानाजीराव उमेदवार दिलेला आहे. कसा आहे माणूस? कामे करतो की नाही?
>> मला कौतुक आहे की, जसं लोकसभेला भाजप आपल्यासोबत होती, तसंच विधानसभेला देखील सोबत आहे. तुझं-माझं आता खूप झालं. असे करून आता चालणार नाही.
>> पवार साहेबांबद्दल मला आदर आहे. भरपूर मेहनत घेत आहेत; पण हीच मेहनत त्यांनी योग्य दिशेने केली असती; तर आज महाराष्ट्राची अशी दुर्दशा झाली नसती.
>> पवारसाहेब असं म्हणत आहेत की हे सरकार घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुम्ही काहीही केलं तरी हे सरकार जाणार नाही. आम्ही तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही.
>> शरद पवार स्वतःच्या पक्षाच्या वसंतदादा पाटलांच्या पाठीवर वार करून मुख्यमंत्री झाले. हा त्यांचा कामाचा अनुभव आहे.
>> ‘शोले’ चित्रपटातील आसरनीसारखे ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ’ अशी अवस्था त्यांची झालेली आहे.
>> दुष्काळामध्ये शेतकऱ्याला मदत, सामूहिक विवाह, चारा छावण्या अशी कितीतरी कामे शिवसेनेने केलेली आहेत.
>> मराठवाड्यातील एका विद्यार्थिनीनं शिक्षणाच्या खर्चाचा बोजा घरावर पडू नये म्हणून आत्महत्या केली.
>> शाळकरी मुलींसाठी आणि विद्यार्थ्यांना बससेवा आपण मोफत सुरू केली.
>> १० रुपयांमध्ये सकस जेवणाची थाळी देणार म्हणजे देणारच.
>> एका रुपयामध्ये आरोग्य चाचणी आपण करणार.
>> शहरातील लोकांसाठी मुख्यमंत्री सडक योजना चालू आहे. पण विरोधक काही काम केलं तरी टीका करतात.
>> ही निवडणूक केवळ कोणाला आमदार करण्यासाठी म्हणून नाही, तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या भविष्यासाठी आहे.
>> राहुल गांधी इतके दिवस होते कुठे?
>> ३७० कलम आम्ही रद्द करणार नाही अशा विचारांच्या लोकांच्या हाती आपण देश द्यायचा का?
>> जी कामे गेल्या ५ वर्षांत युती सरकारने केली त्यामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे याचा मला अभिमान आहे.
>> जेव्हा हे सरकार आले, तेव्हा हे सरकार अस्थिर होतं. या सरकारला भक्कम पाठिंबा शिवसेनेने दिलेला आहे.
>> त्यावेळेस शरद पवारांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांचा डाव मी मोडून काढला.
>> मी त्यांच्यासारखे मागच्या दाराने नाही, समोरून सरकारमध्ये सहभागी झालो आहे.
>> मला जे पटले नाही ते सरकारमध्ये असो किंवा नसो; त्या विरोधात मी गोरगरिबांसाठी आवाज उठवणारच.
>> महाराष्ट्राच्या हितासाठी चांगले काम करताना एकाही कामात शिवसेनेने सरकारच्या तंगड्यात तंगडं घातलेलं नाही.
>> पावसाला मी प्रार्थना करतो की जिथे प्यायला पाणी नाही, जिथे पाणी टंचाई आहे तिथे तू पड.
>> विरोधक मध्ये येतील आणि नाचतील. त्यानां सांगा आमच्या गोरगरिबांच्या सुखाच्या आड येऊ नका.
>> शरद पवार तुम्ही तुमच्या पुतण्याला आवरा. धरणं भरण्यापेक्षा स्वयंपाक केलेला कधीही बरा.
>> अजित पवारांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. दुष्काळाच्या वेळेला तुमचे अश्रू कुठे होते?
>> दगडाला सुद्धा पाझर फुटतो ऐकलं होतं. त्यामुळे अजित पवारांना सुद्धा अश्रू फुटतात हे कळल्यावर बरं वाटलं.
>> युतीचं सरकार येत आहे. उगाच इथे तिथे जाऊ नका, चुकू नका.
>> उन्हात बसून डोके गरम करू नका. विचाराने डोके पेटले पाहिजे.
>> संपूर्ण २८८ ठिकाणचे भगव्याचे शिलेदार विधानसभेमध्ये पाठवा.
>> विधानसभेच्या विजयानंतर आई जगदंबेच्या आशिर्वादासाठी मी पुन्हा येईल. हे मी तुम्हाला वचन देतो.