नागपूर: राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपनं जोरदार धक्का दिला आहे. कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे यांचा पत्ता कापण्यात आला असून त्यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या पत्नीला उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, ती निरर्थक ठरली आहे.
पहिल्या यादीपासूनच धक्कातंत्राचा अवलंब करत भाजपनं पक्षातील मोठ्या नेत्यांना घरी बसवण्याचा धडाका लावला आहे. त्यात एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांचा समावेश होता. त्यात आता बावनकुळेंचाही नंबर लागला आहे. बावनकुळे यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांना उमेदवारी मिळेल, असे बोलले जात होते. बावनकुळे यांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. मात्र, त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्याचं दिसत आहे. त्यांच्या ऐवजी भाजपनं टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली आहे. सावरकर यांच्यानंतर पक्षाच्या फॉर्मवर अनिल निधान यांचे नाव आहे. बावनकुळे या भाजपच्या उमेदवार नसतील, हे भाजपनं स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान होत आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना
४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत
५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर : मतदान
२४ ऑक्टोबर : मतमोजणी