नागपूर: चंद्रस्पर्शासाठी चांद्रयानाप्रमाणेच सारे देशवासियही आतुर झाले आहेत. चांद्रयान-२ चे लँडर असलेले ‘विक्रम’ चांद्रभूमीवर उतरण्यासाठी उद्या, शनिवारपासून पूर्वप्रयत्न सुरू करणार आहे. चंद्रावर सुरक्षितरीत्या उतरण्यासाठी या मोहिमेतील हा सर्वात अखेरचा टप्पा असणार आहे. याची सुरुवात शनिवारी पहाटे होणार आहे. चांद्रयानाचे विक्रम लँडर सध्या चंद्राभोवतीची कक्षा कमी करत चंद्राच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न यशस्वी होत असल्याने नियोजित दिवशी, शनिवारी विक्रम चंद्रावर उतरेल, याबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांना विश्वास आहे. विक्रम लँडरसोबत प्रज्ञान हे रोव्हर देण्यात आले आहे.
विक्रम आपल्या अवतरणाची प्रक्रिया शुक्रवारी उत्तररात्री किंवा शनिवारी पहाटे १ ते २ वाजण्याच्या काळात सुरू करण्रार आहे. त्यानंतर दीड ते अडीच वाजण्याच्या दरम्यान विक्रम त्यासोबत असलेल्या प्रज्ञान या रोव्हरला घेऊन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. भारतासाठी ही अत्यंत गौरवास्पद कामगिरी ठरणार असून यामुळे चंद्रावर स्वतःचे यान उतरवणारा भारत हा रशिया, अमेरिका व चीन यांच्यानंतरचा चौथा देश ठरेल. मात्र चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश असेल.
विक्रम सध्या चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर भ्रमण करत आहे. असे भ्रमण करत असताना चांद्रपृष्ठभागाच्या समीप येताच तो आपली अवतरण प्रक्रिया सुरू करणार आहे. एकदा पृष्ठभागावर उतरल्यानंतर विक्रमपासून रोव्हर प्रज्ञान वेगळे होईल. प्रज्ञान विलग होण्यासाठी शनिवारी पहाटे साडेपाच ते साडेसहा ही वेळ इस्रोने गृहित धरली आहे.
चंद्रावर अलगद उतरणे हा रोमांचकारी अनुभव असेल. इस्रोने असा अनुभव यापूर्वी कधीच घेतलेला नाही. चांद्रयान-१ मोहिमेच्या वेळी चंद्राच्या कक्षेत जाणेच शक्य झाले होते. – के. सिवन, अध्यक्ष, इस्रो