नागपूर: प्रियकरासोबत झालेल्या वादात प्रेयसीने प्रियकरासमोर नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास कन्हान नदीवरील खापरखेडा-पारशिवनी पुलावर घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. पूजा भानदास शाहू (वय २१) असे मृत तरुणीचे, तर सदोक चंदू खरोले (वय २१, दोघेही रा. वार्ड क्रमांक १, भानेगाव), असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रियकराचे नाव आहे.
पूजा ही बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाला होती. तर प्रियकर सदोकने पॉलिटेक्निक (डिग्री) केली आहे. सदोक हा आपल्या आजोबांच्या घरी राहत असून शेजारी राहणाऱ्या पूजासोबत मागील तीन-चार वर्षांपासून त्याचे प्रेमप्रकरण होते. मागील दोन दिवसांपासून काही कारणावरून ते तणावात होते. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सदोक हा आपल्या दुचाकी (क्र. एमएच ४० ई ६१०१)ने घराबाहेर पडला. याचवेळी पूजासुद्धा घराबाहेर पडली. त्या दोघांनीही दोन-तीन तास कोराडी परिसरात घालविल्यानंतर कन्हान नदीवर असलेल्या खापरखेडा-पारशिवनी पुलावर दुपारी ३ वाजताच्या सुमारास ते दोघेही दुचाकीने आले. दुचाकी पुलाच्या मध्यभागी उभी करून ते बराच वेळ बोलत उभे होते. यादरम्यान दोघांत पुन्हा काही कारणावरून वाद झाला. यातच, दुचाकीच्या बॅगमध्ये आधारकार्ड असल्याचे सांगून पूजाने प्रियकर सदोकला आधारकार्ड आणण्यास सांगितले. सदोक आधारकार्ड काढण्यासाठी मागे वळताच काही कळण्याच्या आत पूजाने दुथडी भरून वाहत असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात पुलावरून उडी घेतली. या घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक चंद्रकांत मदने पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, घटनास्थळ पारशिवनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने पारशिवनी पोलिसांना सूचना देण्यात आली. घटनास्थळावर पोलिसांना पूजाच्या पायातील एक चप्पल व बॅग आढळून आली. खापरखेडा पोलिसांनी सदोकला ताब्यात घेऊन पारशिवनी पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री उशिरा पारशिवनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. वृत्त लिहिपर्यंत पूजाच्या आत्महत्येमागील कारण कळू शकले नाही.
आज पुन्हा घेणार शोध
पूजा ही हुशार विद्यार्थिनी होती. पूजाला एक भाऊ असून तिचे वडील एका कंत्राटदाराकडे वाहनचालक आहेत. त्यादोघांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती दोघांच्याही घरच्यांना होती, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, दुपारी १२ वाजतापर्यंत हसत-खेळत घरून निघून जाणारी पूजा अवघ्या तीन-चार तासांत आपली जीवनयात्रा संपवेल, असे कुणालाही वाटले नव्हते. या घटनेनंतर पूजाचे आई-वडील व भाऊ यांना अश्रू अनावर होत होते. कन्हान नदी मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहत असल्याने पूजा दूरवर वाहून गेली असावी, असा अंदाज पोलिसांचा व्यक्त केला आहे. पूजाचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले असून बराच वेळ शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही. शुक्रवारी सकाळी परत रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात येईल, अशी माहिती माहिती पोलिससूत्रांनी दिली.