नागपूर: मागील दोन दिवसांपासून विदर्भात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली शहरात रस्त्यांवर पाणी साचले. नगर परिषद कार्यालयातही पाणी शिरल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. भामरागड आणि मूलचेरा तालुक्यातील दीडशे गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाळा संपण्यापूर्वीच जिल्ह्यात सरासरीपेक्षा १०९ मिलिमीटर अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.
इरईचे पाच दरवाजे उघडले
चंद्रपूर : मुसळधार पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. इरई धरणाचे बुधवारी या मोसमात सहाव्यांदा पाच दरवाजे उघडण्यात आले. इरई धरणाची पाणी पातळी २०७.३७५ मीटरपर्यंत पोहचली आहे. चारगाव, चंदई, लभानसराड, असोलामेंढा, नलेश्वर या धरणांत १०० टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी जितेश सुरवाडे यांनी दिली.