नागपूर: गणरायाचे आज आगमन; सगळीकडे तयारीची लगबग. ‘काय झाली का तयारी? यंदाचे डेकोरेशन छान झालेय बरं का, अरे पटापट करा, उद्या गडबड नको’… असे असंख्य संवाद रविवारी घरोघरी, गल्लोगल्ली ऐकू आले. कारण सर्वांचा लाडका बाप्पा वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा अकरा दिवसांच्या मुक्कामासाठी येतोय. ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष करीत आज, सोमवारी घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण असून खरेदीसाठी बाजारपेठ आणि चितारओळ गर्दीने फुलली आहे.
फूल, मिठाईला मागणी
पुढे वाचा:
गणरायाचे आज आगमन; सगळीकडे तयारीची लगबग
पूजेच्या तयारीसाठी लागणारे साहित्य, तसेच मूर्ती खरेदीसाठी सर्व बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवड्याची पाने, कमळ, दुर्वा, तुळशी, पत्री यांना चांगली मागणी आहे. प्रसादासाठी पेढे, मोदक यांचीही खरेदी सुरू झाली असून प्रसाद साहित्याचीही मोठी उलाढाल बाजारात सुरू आहे. गणरायांच्या आगमनाची लगबग रविवारी बाजारपेठेत तसेच घरोघरी दिसून आली. सोमवारी सकाळी गणपतीची प्रतिष्ठापना असल्यामुळे रविवारपासूनच घरोघरी प्रतिष्ठापना करणाऱ्या गणेशमूर्ती चितारओळीतून वाजतगाजत नेल्या जात होत्या. नागपूरबाहेरील अनेक सार्वजानिक गणेश उत्सव मंडळांनी चितारओळीत गणपतीची मूर्ती नेण्यासाठी गर्दी केली होती. गणपतीच्या मूर्ती नेण्यासाठी सेंट्रल अॅव्हेन्यूवर सकाळपासून चारचाकी गाड्यांची जणू रांग लागली होती.
मोठ्या मूर्तींचे आगमन अॅडव्हान्समध्ये
गणरायाचे आज आगमन; सगळीकडे तयारीची लगबग महालातील संती गणेशोत्सव मंडळासह शहरातील विविध भागांतील गणेशमूर्ती ढोल-ताशांच्या निनादात रविवारी दुपारी चितारओळीतून नेण्यात आल्या. याशिवाय, रेशीमबागेतील ‘नागपूरचा राजा’चे आगमन शनिवारी सकाळीच झाले. काही मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सोमवारची प्रतीक्षा न करता रविवारी सायंकाळपर्यंत गणरायाची मूर्ती मंडपस्थळी नेण्याचा निर्णय घेतला. तर हिलटॉप येथील आमदार प्रकाश गजभिये यांच्या मंडळाद्वारे बसविण्यात येणाऱ्या सर्वांत उंच गणपतीची मिरवणूक सोमवारी सकाळी चितारओळीतून काढण्यात येणार आहे.