नागपूर : कर्नाटकमधील कुमारस्वामी यांचे सरकार पडल्यानंतर आज तीन दिवसांनी कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळाआजच घेण्यात यावा अशी विनंती येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना केली. राज्यपाल वाला यांनी येडियुरप्पांचा प्रस्ताव मंजूर केला असून आजच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथग्रहण सोहळा होणार आहे. दरम्यान, येडियुरप्पा हेच कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील अशी माहिती पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिलीय. येडियुरप्पा आज संध्याकाळी ६ वाजता शपथ घेतील. आपण राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला असून आज संध्याकाळी ६ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ, अशी माहिती येडियुरप्पा यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करावे लागणार
कर्नाटकात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारपुढे खरे आव्हान बहुमत सिद्ध करण्याचे असेल. याचे कारण म्हणजे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी गुरुवारी काँग्रेसच्या तीन बंडखोर आमदारांचे कृत्य पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अयोग्य असल्याचे म्हटले आहे. त्यात अजूनही १४ बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारणे शिल्लक आहे. अशात सभागृहात आमदारांची संख्या २२२ इतकी आहे. बहुमतासाठी भाजपला ११२ आमदारांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत भाजपकडे १०६ आमदारांचे समर्थन आहे. यामुळे आवश्यक असेलल्या ६ आमदारांचे पाठबळ भाजप कुठून मिळवणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अधिक वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार दोन लाख राखी