नागपूर: भाजपच्या ‘संघटन पर्व’अंतर्गत पक्षासोबत नागरिकांना जोडण्यासाठी सुरू असलेल्या विविध अभियानात रक्षाबंधनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरातून दोन लाख राखी पाठवण्याचा निर्धार महिला मोर्चाने व्यक्त केला.
यासंदर्भात तयारीसाठी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात गुरुवारी ‘महिला शक्ती सन्मान’ संमेलन झाले. प्रत्येक बुथवरून शंभर राखी, अर्थात एका विधानसभा मतदारसंघातून सुमारे ३५ हजार राखी पाठवण्यात याव्या. त्यादृष्टीने नियोजन करण्याची सूचना शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी केली. यास उपस्थिती महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घरोघरी जाऊन सदस्य नोंदवण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार व प्रदेश सरचिटणीस अर्चना डेहनकर यांनी केले. यावेळी आमदार सुधाकर देशमुख यांनी महिलांना पक्षाचे सदस्य केले. उपस्थितांनी मोबाइलचा टॉर्च लावून सदस्यत्व स्वीकारले.
मोर्चाच्या अध्यक्ष डॉ. कीर्ती अजमेरा यांनी प्रास्ताविक केले. संमेलनास आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव, कल्पना पांडे, चेतना टांक, मनीषा काशीकर, नीता ठाकरे, नीलिमा बावणे, संध्या ठाकरे, लता येरखेडे, प्रीती राजदेरकर उपस्थित होत्या.
शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण नागपुरातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव व सदस्य नोंदणीचा प्रारंभ शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आज, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता शारदा चौकातील स्मृती सभागृहात हा कार्यक्रम होणार असल्याचे आमदार सुधाकर कोहळे यांनी सांगितले.
अधिक वाचा : ‘भीम’ शब्द जातीवाचक नाही- भीमसेनेने घेतली उच्च न्यायालयात धाव