नागपूर : केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारमधील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात ‘एम्स’च्या शैक्षणिक सत्राला नागपुरात सुरुवात झाली. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० विद्यार्थ्यांना घेऊन ‘एम्स’चे शैक्षणिक सत्रही सुरू झाले. दुसऱ्या टप्प्यात यात आणखी ५० विद्यार्थ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे ‘एम्स’मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदवी शिक्षण घेणाऱ्या दोन बॅचला वैद्यकीय अभ्यासक्रमाचे धडे देण्यासाठी वैद्यकीय शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया जोमात आली आहे. त्यासाठी इच्छुकांनी केलेल्या अर्जात स्थानिकांची संख्या मोठी असल्याने निम्मे मेडिकल, मेयो रिकामे होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
या नियुक्त्या झाल्यास राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या दोन सरकारी वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये वैद्यकीय शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या वाढणार आहे.
नागपुरात ‘एम्स’च्या पहिल्या वर्षाचे प्रवेश सुरू झाल्यानंतर स्वायत्त संस्था असलेल्या या इन्स्टिट्युटसाठी तब्बल वैद्यकीय शिक्षक दर्जाच्या २४८ पदांचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यावेळी निवड प्रक्रिया होऊन ‘मेडिकल’मधील डॉक्टर ‘एम्स’मध्ये रुजू होतील, असे वाटत होते. परंतु, तसे झाले नाही. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीत मेडिकलमध्ये कार्यरत वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती होत आहे. यामुळे भविष्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षकांची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नुकत्याच झालेल्या पदभरतीत नागपूरच्या मेडिकलमधील डॉ. मीना वाजपेयी यांची तर यवतमाळचे प्रभारी अधिष्ठाता पदावर कार्यरत डॉ. मनीष श्रीगिरीवार यांची नियुक्ती झाली. याशिवाय डॉ. विकास मेश्राम, डॉ. बिपीनचंद्र तिरपुडे, डॉ. हृषिकेश पाठक, डॉ. मंदार साने, डॉ. विजयश्री देवतळे, डॉ. राहुल नारंग, डॉ. नीता गाडे, डॉ. विवेक हाडा यांचीही नियुक्ती झाली. सध्या एम्समध्ये दुसऱ्या टप्प्यात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. तूर्तास मेडिकलमध्येच ५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र सुरू असले तरी लवकरच एम्समध्ये ४० हजार स्वेअर फूट जागा वापराचा अधिकार एम्सला मिळाला आहे. त्याच्या बांधकामाची प्रक्रियाही वेगात सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातले शैक्षणिक सत्र स्वत:च्या जागेत सुरू करण्यास एम्स प्राधान्य देत आहे. तुर्सात मेडिकलमध्ये सुरू असलेल्या एम्सच्या शैक्षणिक सत्रासाठी तीन लेक्चर हॉल, तीन प्रयोगशाळा, अधिकाऱ्यांना निवासासाठी अधिष्ठातांच्या बंगल्यासह पाच बंगले आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी आणखी तीन बंगले हस्तांतरित केले आहे.
अधिक वाचा : नागपूर : तलावात बुडून दोन एलआयसी एजंट्सचा मृत्यू