नागपूर : मानकापूरमधील कल्पना टॉकीज परिसरात कुख्यात लकी खान याच्यावर सिनेस्टाइल गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेने परिसर हादरला. ही घटना मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. तीन लाख रुपयांच्या वादातून घडलेल्या या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी सोहेल, धरम ठाकूर, राजेश, नब्बू, अकिल अन्सारी, गुलाम आरिफ व त्याचा पाच साथीदारांविरुद्ध कट रचून गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सूत्रधार धरम असल्याची माहिती आहे.
लकी खान हा कुख्यात गुन्हेगार आहे. गेल्या काही महिन्यांपासून धरम ठाकूर व लकी खान या दोघांमध्ये तीन लाख रुपयांसाठी वाद सुरू आहे. महिनाभरापूर्वी दोघांनी एकमेकांना ठार मारण्याची धमकी दिली होती. हे प्रकरण यशोधरानगर पोलिस स्टेशनमध्येही पोहोचले होते. तेव्हापासून दोघांमधील वाद विकोपाला गेला होता. लकी खान हा धरमचा तर धरम हा लकी खानच्या हत्येचा कट आखत होता. मंगळवारी लकी हा त्याच्या साथीदारांसह श्रीराम टॉवर येथे गेला. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास लकी साथीदारांसह कारने घरी जात होता. कल्पना टॉकीज परिसरात मागाहून आलेल्या कारने लकीच्या कारला धडक दिली.
त्यानंतर लकीवर पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली. गोळी लकीच्या उजव्या हातावर लागली. तो थोडक्यात बचावला. त्यानंतर लकीने कार थेट मानकापूर पोलिस स्टेशनकडे वळविली. काही अंतरापर्यंत हल्लेखोरांनी लकीच्या कारचा पाठलाग केला. मात्र, कार मानकापूर पोलिस स्टेशनच्या दिशेने जात असल्याचे कळताच हल्लेखोर पसार झाले. लकीला लगेच खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी धरम, सोहेलसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सीसीटीव्हीद्वारे हल्लेखोरांचा शोध
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यावेळी सोहेल हा साथीदारांसह घटनास्थळी असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय घटना नेमकी कशी घडली, हल्लेखोर कोणत्या मार्गाने आले, याचाही शोध पोलिस सीसीटीव्हीद्वारे घेत आहेत.
तपास गुन्हेशाखेकडे
लकी खानवरील गोळीबार टोळीयुद्धातून करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य ओळखून गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गोळीबार प्रकरणात पोलिसांनी अकील अन्सारी याला अटक केली आहे.
सुभाष शाहू हत्याकांडानंतर आला लकी चर्चेत
लकी खान हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने चित्रपटातही काम केले आहे. अपहरण, फसवणूक व हत्येसह अनेक गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. २९ सप्टेंबर २०११ मध्ये उपराजधानातील बहुचर्चित मांडवली बादशाह व बुकी सुभाष शाहू याची प्रसादामध्ये सायनाइड देऊन हत्या करण्यात आली. सुरुवातीला पाच वर्षांपर्यंत या प्रकरणातील मारेकरी मोकाट होते. पाच वर्षांनंतर २०१६ मध्ये या प्रकरणाचा तपास गुन्हेशाखा पोलिसांकडे देण्यात आला. सुभाष शाहू हत्याकांडात गुन्हेशाखा पोलिसांनी लकी खान व सुभाषचा विश्वासू महेश ऊर्फ गमछू नामदेवराव लांबट या दोघांना अटक केली होती. या हत्याकांडात गमछूची निर्दोष सुटका झाली तर लकीला जन्मठेपेची शिक्षा झाली. सुभाष शाहू हत्याकांडानंतर लकी हा उपराजधानीत चर्चेत आला होता.
जामिनासाठी केला खर्च
सर्वोच्च न्यायालयाने लकीला जामीन मंजूर केला आहे. सहा महिन्यांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला. लकीला जामीन मिळविण्यासाठी धरम याने तीन लाख रुपयांचा खर्च केला होता. धरम त्याला पैसे परत मागत होता. यावरूनच दोघांमध्ये वाद सुरू होता, अशीही माहिती आहे.
अधिक वाचा : मानेवाड़ा के घर में पहुंची विशालकाय छिपकली