नागपूर : कुख्यात गुन्हेगार विक्की अरुण चव्हाण याची धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत त्याचा साथीदार अभिषेक मुन्नाजी मेहरे हा जखमी झाला. ही थरारक घटना रविवारी रात्री वाडी नगरपरिषदजवळील महिला-बाल संगोपन केंद्र परिसरात घडली. वर्चस्वाच्या वादातून विक्कीची हत्या करण्यात आली असून, या घटनेने वाडीत टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मेहरे याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अर्पित निंभोरकर व सनी ऊर्फ अभिषेक वऱ्हाडपांडे या दोघांना अटक केली आहे.
विक्की (वय २३ वर्ष ,रा. शिवाजीनगर) याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपारही करण्यात आले होते. एका प्रकरणात तो येरवडा कारागृहात बंदी होता. काही दिवसांपूर्वीच तो बाहेर आला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर विक्की हा परिसरात दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पायल बारसमोर सनी व विक्कीच्या मित्राचा वाद झाला. याबाबत माहिती मिळताच विक्की, सनी व अर्पित हे तेथे गेले. विक्की व अर्पित दोघांमध्ये हाणामारी झाली. दोघांनीही एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिली. रात्री विक्की व त्याचा साथीदार अभिषेक मेहरे (वय २२, रा. टेकडी वाडी) हे दोघे घरी जात होते. अर्पित, सनी व त्याच्या साथीदारांनी दोघांना गाठले. विक्कीने चाकूने अर्पितवर वार करण्याचा प्रयत्न केला. अर्पितने विक्कीच्या हातातील चाकू हिसकावला. त्याच चाकूने विक्कीवर सपासप वार केले. विक्की रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. अभिषेकवरही चाकूने वार करण्यात आले. अभिषेकने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करीत विक्कीच्या नातेवाइकांना माहिती दिली. नातेवाइकांनी वाडी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच विक्कीचे नातेवाइक व वाडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. विक्कीचा भाऊ सागर याने विक्कीला जवळीलच खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
सट्टेबाजांवर संशय
वाडीतील वडधामना व परिसरात तीन सट्टापट्टीचे अड्डे सुरू आहेत. याशिवाय, वाडी भागात अवैध धंद्यांचाही सुळसुळाट आहे. एक सट्टाअड्डा रोशन नावाच्या गुन्हेगाराचा आहे. दोन दिवसांपूर्वी विक्कीने त्याला पैशाची मागणी केली होती. अन्य दोघांनाही विक्कीने पैसे मागितले. या तिघांनी अर्पित व सनीला हाताशी धरून विक्कीचा ‘गेम’ केल्याची चर्चाही परिसरात आहे.
सनीच्या घरावर दगडफेक
विक्कीच्या मृत्यूने त्याचे साथीदार संतापले. विक्कीचे साथीदार व नातेवाइकांनी सोमवारी दुपारी सनीच्या घरावर दगडफेक केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. सनीच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे.
नुकतेच झाले होते साक्षगंध
विक्कीने गुन्हेगारी जगत सोडून सामाजिक कार्याला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच त्याचे साक्षगंध झाले. लग्नाची तयारी सुरू असतानाच विक्कीची हत्या झाल्याने नातेवाइकांना धक्का बसला आहे. विक्कीचे साथीदारत्त्याच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चाही आहे.
अधिक वाचा : Sony SAB’s Bhakharwadi completes 100 episodes