नागपूर : बनावट दस्तऐवज व मूळ मालकाऐवजी अन्य एका व्यक्तीला मालक दाखवून दलालाने प्लॉटची परस्पर विक्री केली. आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी केलेल्या तपासानंतर ही घटना समोर आली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी दलालासह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दलाल उमेश यादव आणि तोतया आनंदकुमार महेंद्रकुमार झा ,अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मूळ झारखंड येथील आनंदकुमार महेंद्र झा (वय ६१, रा. अमर टॉवर,यशोधरानगर) हे वेकोलित कार्यरत होते. त्यांनी सोमलवाडा येथे दीड हजार चौरस फुटांचा प्लॉट खरेदी केला होता. सध्या या प्लॉटची किमती ६० लाखांपेक्षा अधिक आहे. दलाल यादव याने आनंदकुमार ऐवजी अन्य एका व्यक्तीचे आनंदकुमार झा नावाने बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार केले. त्याआधारे दोघांनी हा प्लॉट ट्युशन क्लासचे संचालक भूषण किशोर मुळे यांना ३८ लाख रुपयांमध्ये विकला. मुळे यांनी हा प्लॉट बँकेत गहाण ठेऊन तेथे घर बांधले. यादरम्यान प्लॉटचे मूळ मालक आनंदकुमार झा यांनी प्लॉटचे ‘प्रॉपर्टी कार्ड’ काढले असता त्यांना प्लॉट भूषण मुळे यांच्या मालकीचा असल्याचे दिसले. त्यांना धक्का बसला. त्यांनी मुळे यांच्याकडे चौकशी केली.
दलाल उमेश यादव याच्या मदतीने हा प्लॉट खरेदी करून घर बांधल्याचे मुळे यांनी मूळ मालक झा यांना सांगितले. झा यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली. आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी तपास करून यादव तोतया मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अशा प्रकारे फसवणूक झालेल्या प्लॉट रकांनी आर्थिक गुन्हे शाखा किंवा ०७१२-२५६६६०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन खराबे यांनी केले आहे.
अधिक वाचा : Ambazari garden Nagpur : A tale of nagging neglect