मँचेस्टर : ‘पाकिस्तानच्या महंमद आमीरविरुद्ध काळजीपूर्वक न खेळता आक्रमक व्हा,’ असा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट संघातील फलंदाजांना दिला आहे. भारताची रविवारी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध लढत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सचिनने संघाला काही सूचना दिल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत आमीरने पाच विकेट घेतल्या होत्या. सध्या तो पाकिस्तानचा ‘हुकमी एक्का’ ठरतो आहे. तेंडुलकर म्हणाला, ‘त्याने टाकलेले चेंडू निर्धाव खेळून काढण्याच्या नकारात्मक मानसिकतेने जायलाच नको. संधी मिळाली, तर त्याच्याविरुद्ध प्रहार करायलाच हवा. भारतीय फलंदाजांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत आणि सकारात्मक पद्धतीने खेळावे.’ मैदानावर टिकून राहण्याचा मुद्दा नाही. मात्र, वेगळा प्रयोगही करायला नको. भारताने सर्वच आघाड्यांवर आक्रमक राहिले पाहिजे. तुमची देहबोली फार महत्त्वाची आहे. तुम्ही आत्मविश्वासाने सामना केला, तर गोलंदाजालाही ते जाणवते, असे सांगायलाही तेंडुलकर विसरला नाही.
भारतीय संघाने या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला नमविले आहे, तर भारताची न्यूझीलंडविरुद्धची लढत पावसामुळे अनिर्णित राहिली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला चार पैकी एकच लढत जिंकता आली आहे, दोन लढतींत पराभव पत्करावा लागला असून, एक लढत अनिर्णित राहिली आहे. या वर्ल्ड कपमध्ये सर्वांनाच भारत-पाक लढतीची उत्सुकता आहे. पाकिस्तानला अद्याप एकदाही वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत करता आलेले नाही. अशा स्थितीत भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तान विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आपले सुरुवातीचे ‘लक्ष्य’ बनवतील, असेही तेंडुलकरला वाटते. वर्ल्ड कपचा मोठा अनुभव असलेला तेंडुलकर म्हणाला, ‘भारतीय फलंदाजांमध्ये रोहित आणि विराट हे सर्वांत अनुभवी फलंदाज आहेत. त्यांना लवकरात लवकर बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. जेणेकरून त्यांना विजयाची संधी निर्माण होईल. आमीर आणि वहाब रियाझ हे त्यांना झटपट गुंडाळण्याचा प्रयत्न नक्कीच करतील.’
अधिक वाचा : राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार; नव्या नावांबाबत उत्सुकता शिगेला