नागपूर : शिवसेना-भाजपचे सूर पुन्हा जुळल्यापासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. रविवार, १६ जून रोजी, म्हणजेच उद्या हा विस्तार होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. नव्या विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, अन्य कोणाला संधी मिळणार आणि कोण ‘वेटिंग’वर राहणार याविषयी देखील प्रचंड उत्सुकता आहे.
मागील विधानसभा निवडणुकीआधी तुटलेली सेना-भाजपची युती २०१९च्या लोकसभा निवडणुकीआधी पुन्हा झाली. त्यात राज्यातील सत्तावाटपाचं सूत्रही ठरलं आहे. त्यानुसार लगेचच महामंडळावरील नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळं मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली. या चर्चेअंती नव्या विस्तारावर शिक्कामोर्तब झालं. फडणवीस यांनी त्याबाबत ट्विटही केलं होतं. त्यानुसार उद्या हा विस्तार होणार आहे. या विस्तारात सेनेकडं उपमुख्यमंत्रिपद आल्यास त्या पदावर कोणाची वर्णी लागणार हे पाहावं लागणार आहे.
आशिष शेलार यांना संधी मिळणार ?
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची शक्यता आहे. शेलार यांच्या नेतृत्वाखालील भाजपनं मुंबईत चांगलाच जम बसवला आहे. महापालिकेतही भाजप स्वबळावर शिवसेनेला तोडीस तोड जागा मिळवल्या होत्या. लोकसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेना युतीला शंभर टक्के यश मिळालं. यातही शेलार यांच्या संघटन कौशल्याचा वाटा असल्याचं बोललं जातं. शेलार यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी उत्तम समन्वय आहे. त्यामुळं ते मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असल्याचं मानलं जातंय.
अधिक वाचा : नागपूर शहरावर जलसंकटाचे सावट