नागपूर : शहरातील विविध प्रलंबित कामांसंदर्भात उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी शुक्रवारी (ता.१४) आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये यासंबंधी बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्यासह स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता राजेश भुतकर, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य, ग्रंथालय अधीक्षक अलका गावंडे, कन्सल्टंट यादव आदी उपस्थित होते.
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी पिवळी मारबत डी.पी. रोड, नाईक तलाव ते बैरागीपुरा सिमेंट रोड/अतिक्रमण, नाईक तलाव बाजार हस्तांतरण, नाईक तलाव सौंदर्यीकरण (डी.पी.आर.), नाईक तलाव एस.टी.पी., ई-लायब्ररी, पाचपावली पूल दुरूस्ती, जुने मस्कासाथ झोन (व्यापारी संकुल) आदी विषयांचा आढावा घेतला.
पिवळी मारबत डी.पी. रोड संदर्भात निरीक्षण करण्यासाठी बुधवारी (ता.१९) उपमहापौर दीपराज पार्डीकर संबंधित अधिका-यांसोबत दौरा करणार आहेत. याशिवाय नाईक तलाव ते बैरागीपुरा सिमेंट रोड भागात असलेल्या अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली असून त्याचीही पाहणी उपमहापौर पार्डीकर बुधवारी करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
पाचपावली पुलाच्या दुरूस्ती संदर्भात १३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या पुलाचा सुमारे एक तृतीयांश भाग आसीनगर झोनमध्ये येतो. या भागातील बॅरीकेट्सचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
जुने मस्कासाथ झोन (व्यापारी संकुल) जीर्ण झाले असून याबाबद स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले असून पुढील कार्यवाहीसाठी ते बाजार विभागाला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. याबाबत भागातील सर्व व्यापा-यांना पत्र देउन त्यांच्याशी समन्वय साधून झोनस्तरावर आठवड्याभरात कार्यवाहीसंबंधी निर्णय घ्या, असे निर्देश उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. याशिवाय इतर सर्व कामांबाबतही उपमहापौरांनी आढावा घेत संबंधित प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी तातडीने कार्यवाही करण्याचेही निर्देश यावेळी दिले.
अधिक वाचा : जेईई अॅडव्हान्समध्ये चंद्रपूरचा कार्तिकेय देशात पहिला