नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावनरून दिल्लीकडे निघालेल्या राजधानी एक्स्प्रेसला नरखेडजवळ आग लागल्याने बुधवारी रात्री खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत प्राणहानी झाली नाही. मात्र, या मार्गावरील अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. दरम्यान, या घटनेची चौकशी करण्यासाठी तीनसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नरखेड-दारीमेटा स्थानकांदरम्यान घडली.
बुधवारी रात्री ९ वाजता १२४३७ सिकंदराबाद-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस नागपूर स्थानकावरून सुटली. ती नरखेडजवळ असतानाच एसएलआर या शेवटच्या बोगीला आग लागल्याचे लक्षात आले. ही बोगी साधारणत: महिला किंवा विशिष्ट वर्गासाठी राखीव असते. घटना घडली त्यावेळी बोगीत कुणीही प्रवासी नव्हता. गार्डला धूर दिसताच त्याने लोको पायलटला याबाबत वॉकीटॉकीवर सांगितले. त्याबरोबर लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेकचा उपयोग करून गाडी थांबवली व पुढील अनर्थ टळला. रेल्वे नियंत्रण कक्षाला याबाबत कळताच या मार्गावरील सर्व गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या. त्याचप्रमाणे नागपुरातून अधिकारी, कर्मचारी, आरपीएफ जवान, नरखेड, पांढुर्णा येथून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग लागलेला कोच गाडीपासून वेगळा करण्यात आल्यानंतर राजधानी पुढील प्रवासाला रवाना झाली. या घटनेच्या चौकशीसाठी मुख्यालय स्तरावरून समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती सदस्यांबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. समितीत तीन सदस्य असून नागपूरचे अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक एन. के. भंडारी यात सहकार्य करतील.
या गाड्यांवर परिणाम
आगीच्या घटनेमुळे दिल्ली मार्ग काही वेळ प्रभावित झाला. नागपूर रेल्वेस्थानकावर आलेली १२६४६ संपर्कक्रांती एक्स्प्रेस जवळपास दोन तास, १९६०४ अजमेर हमसफर आपल्या निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिरा धावत होती. त्याचप्रमाणे १६०३१ अंदमान एक्स्प्रेस सकाळी ५.३०पर्यंत रेल्वेस्थानकावर थांबून होती. याशिवाय २२४१५ एपी एक्स्प्रेसवरही प्रभाव पडला. १८२३७ छत्तीसगड़ एक्स्प्रेसला कळमेश्वर स्थानकावर थांबविण्यात आले, तर केरळ एक्स्प्रेसलाही उशीर झाला.
केरळचा अपघात टळला
विशेष म्हणजे क्षतिग्रस्त बोगीवर केरळ एक्स्प्रेस आदळण्याची शक्यता होती. मात्र, लोको पायलटच्या सतर्कतेने हा अपघात टळला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरून तिरुअनंतपुरम-नवीदिल्ली केरळ एक्स्प्रेस जाते. राजधानी एक्स्प्रेसला आग लागल्यानंतर ती बोगी मुख्य गाडीपासून बाजूला करण्यात आली. मात्र, ही बोगी मुख्य मार्गावरच होती. त्याचवेळी केरळ एक्स्प्रेस आली व त्या गाडीच्या पायलटनेही इमर्जन्सी ब्रेकचा वापर केल्याने पुढील अनर्थ टळला.
अधिक वाचा : सीमेंट सड़क के कार्य में लापरवाही, विधायक कोहले ने किया दौरा