नागपूर : मिहानमधील विशेष आर्थिक क्षेत्रात आगामी काळात ५०० कोटींची नवीन गुंतवणूक होत असून मोठ्या व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांनी येथे प्रकल्प उभारण्यासाठी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती मिहानचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी दिली.
मिहानमध्ये गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नतीन गडकरी हे प्रयत्न करीत आहेत. फ्रान्सच्या शिष्टमंडळासोबत गेल्या नोव्हेंबर महिन्यात नागपुरात बैठक घेण्यात आली होती. तेव्हा दसॉल्टसोबतच इतर एव्हिएशन कंपन्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मिहान व कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहयोग करार केले होते. त्या कराराला आता मूर्त स्वरूप देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानंतर नागपुरात रिलायन्स एअरोस्पेस पार्क तयार करण्यात आला. त्यात दसॉल्ट कंपनीने फाल्कन व राफेल विमान उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार फाल्कन विमानाचे उत्पादन सुरू झाले असून सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्ण तयार झालेले फाल्कन विमान नागपुरातून झेप घेणार आहे. दसॉल्टला पूरक म्हणून थॅलेस ही एव्हिएशन रडार कंपनी देखील नागपुरात गुंतवणूक करीत आहे. या कंपनीसोबत सहयोग करार झालेला आहे.
दरम्यान, दसॉल्ट कंपनीला सहयोग करण्यासाठी फ्रान्सच्या एव्हिएशन कंपन्याही मिहानमध्ये उतरल्या आहेत. त्यात टूर्गिस गिलार्ड या कंपनीला दोन एकर जागा देण्यात आली आहे. सदर कंपनी दोन आसनी विमाने उत्पादीत करते. तर मिहानमध्ये ही कंपनी दसॉल्टच्या युनिटसाठी लागणारे एरोनॉटिक्स रोबोटिक सिस्टीम तयार करणार आहे. या कंपनीचे उत्पादन लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय व्हीआर एरोनॉटिक्स या कंपनीला देखील एक एकर जागा मिहानमध्ये देण्यात आली आहे. या कंपनीने फ्रान्सच्या एका कंपनीसोबत संयुक्त भागीदारी उपक्रम स्थापन केला आहे. ही कंपनीदेखील दसॉल्टसाठी अॅन्सीलरी युनिट म्हणून काम करणार आहे.
याशिवाय व्हीडीआयएचपीएल या समुहाला सात एकर जागा मिहानमध्ये देण्यात आली असून त्या कंपनीमार्फतही एव्हिएशन सेक्टरमधील क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. तसेच वायुयोम या नागपुरातील कंपनीला देखील एक एकर जागा देण्यात आली आहे. सदर कंपनी देखील एव्हिएशन सेक्टरमध्ये सुट्या भागांचे उत्पादन करणार आहे.
इंडोमार एमआरओ
मिहान आगामी काळात एव्हिएशन सेक्टरमधील जागतिक गुंतवणूकीचे स्थान होणार आहे. टाल, एअर इंडिया, रिलायन्स, दसॉल्ट या बड्या कंपन्यांसोबतच इंडोमार ही भारत अमेरिका यांच्या संयुक्त उपक्रमातील कंपनी मिहानमध्ये २०२० पर्यंत गुंतवणूक करणार आहे. या कंपनीला देखील १०० एकर जागा उपलब्ध करून देण्यात येत असून अमेरिकेतील विमानांच्या देखभाल व दुरूस्तीचा मोठा प्रकल्प येथे स्थापन होत आहे. या कंपनीने मिहानमध्ये बांधकाम सुरू केले असून त्यांची प्रशासकीय इमारत तयार होत आहे.
टीएसला ५० एकर जागा मिळणार
टीसीएस या आयटी कंपनीने मिहानकडे आणखी ५० एकर जागेची मागणी केली आहे. सध्या टीसीएसने सुमारे पाच हजार युवकांना रोजगार दिला असून त्यांनी विस्तारासाठी जमीन मागितली असून त्यावर २५ जून रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. केंद्र सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर महिन्याभरात जमीन हस्तांतरणाचा करार होईल.
गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या अशा
कंपन्या रोजगार
थॅलेस ५० ते १००
टुर्गिस गिलार्ड २० ते ५०
व्हीआर एरो ३० ते ५०
इंडोमार ५००
अधिक वाचा : ८२ हजार वृक्षांची होणार लागवड : महापौर नंदा जिचकार