नागपूर : पावसाळ्याचे दिवस सुरू होत असल्याने वीज कंपनीने खोदून ठेवलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे. त्याचे योग्य रीतीने पुनर्भरण करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
नागपूर शहरात मनपा हद्दीत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला महापौर नंदा जिचकार, आयुक्त अभिजीत बांगर, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, हनुमान नगर झोन सभापती माधुरी ठाकरे, नगरसेविका रिता मुळे, रूपाली ठाकूर, स्वाती आखतकर, नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, महावितरणचे अधीक्षक अभियंता (शहर) दिलीप दोडके, हुडकेश्वर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संदीप भोसले, ॲड. रमण सेनाड यांच्यासह मनपाचे सर्व कार्यकारी अभियंता, सहायक आयुक्त उपस्थित होते.
वीज कंपनीकडून शहरात विविध ठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहे. कंपनीचे सामान रस्त्यांवर पडून आहे. पुन्हा खोदकामासाठी मनपाकडे परवानगी मागत आहेत. खड्ड्यांचे पुनर्भरण योग्यरीत्या करण्यात आलेले नाही. पावसाळ्याच्या दिवसांत याचा नागरिकांना त्रास होईल, ही समस्या माजी महापौर प्रवीण दटके यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडली. यावर निर्णय घेत तातडीने रस्त्यांचे पुनर्भण योग्य रीतीने करण्याचे निर्देश दिले. कामात हयगय गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले. वीज कंपनीने मनपासोबत समन्वय ठेवणे आवश्यक आहे. मनपाच्या मुख्य अभियंत्यासोबत समन्वय ठेवून सध्या जी कामे सुरू आहेत, त्याठिकाणी पूर्वी वीज कंपनीची जी कामे आहेत, ती पूर्ण करा, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
शासनाच्या निर्णयानुसार लोकांना पट्टेवाटप करण्यात येत आहे. नझुलच्या जागेवरील पट्टेवाटपासाठी दुय्यम निबंधकाकडे रजिस्ट्रीसाठी गेले असता अडीचशे वर्गफुटासाठी ४४ हजार रुपये मुद्रांकशुल्क मागितल्याचे माजी महापौर प्रवीण दटके यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर बोलून हा प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले.
यानंतर दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील विविध कामांचा आढावा ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. रेशीमबाग येथील मनपा समाजभवन संस्थेला देण्यासंदर्भात विषय चर्चेला आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतील, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. राजाबाक्षा येथील देवस्थान विकासाकरिता मंजूर निधीचा उपयोग करून तातडीने तेथील कार्य सुरू करण्यात यावे, रमना मारोती ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर निधीतून मंदिर व परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले. छोटा ताजबागचा स्वदेश दर्शन अंतर्गत विकास प्रस्तावित आहे. त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील व विकास कार्य सुरू होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. दक्षिण नागपुरातील झोपडपट्टी धारकांना पट्टेवाटप करण्यासंदर्भातील अडचणी दूर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. कस्तुरचंद पार्क येथे प्रस्तावित सर्वात उंच राष्ट्रध्वजाचे काम रखडलेले आहे. यासंदर्भात ११ जून रोजी तातडीची बैठक घेऊन त्यावर त्वरित निर्णय घेण्यात यावा, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
बैठकीला संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : महापौर नंदा जिचकार : योग दिनाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी पुढे या !