नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या धरमपेठ झोन सभापतीपदी अविरोध निवडून आलेले अमर बागडे यांनी शुक्रवारी (ता.७) सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. धरमपेठ झोन कार्यालयाच्या परिसरात पदग्रहण समारंभात त्यांनी झोन सभापती म्हणून सुत्र हाती घेतली.
कार्यक्रमाला आमदार सुधाकर देशमुख यांच्यासह आमदार डॉ.परिणय फुके, धरमपेठ झोनचे नवनिर्वाचित सभापती अमर बागडे, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी झोन सभापती प्रमोद कौरती, नगरसेवक कमलेश चौधरी, हरीश ग्वालबंशी, नगरसेविका रूपा रॉय, परिणीता फुके, उज्ज्वला शर्मा, रूतिका मसराम, शिल्पा धोटे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयप्रकाश गुप्ता, भाजपा पश्चीम नागपूर मंडळ अध्यक्ष किसन गावंडे, महामंत्री अभय दीक्षित आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. परिणय फुके यांच्यासह अन्य मान्यवरांनी अमर बागडे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार सुधाकर देशमुख म्हणाले, झोन सभापती हे झोनचे ‘मिनी महापौर’ असतात. त्यामुळे आता प्रत्येक प्रभागाला समान न्याय देण्यासाठी काम करण्याची गरज आहे. यासाठी सर्वांना सोबत घेउन काम करण्याची गरज आहे. एक सामान्य कार्यकर्ता असलेल्या अमर बागडेंना नगरसेवक व पुढे झोन सभापतीपदाची जबाबदारी देउन सर्व समाजाला सोबत घेउन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या विश्वासाला खरे उतरून प्रशासन व नागरिकांशी समन्वय निर्माण करून नागरिकांच्या सुविधेसाठी कार्य करा, असा सल्ला आमदार सुधाकर देशमुख यांनी यावेळी नवनिर्वाचित झोन सभापतींना दिला.
प्रभाग १३ साठी आजचा दिवस मोठा असून आपल्यातीलच एक कार्यकर्ता आज ‘मिनी महापौर’ बनणे ही अभिमानास्पद बाब आहे, असे आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले. यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्याने आचारसंहितेचे पालन करीत त्यापूर्वी नागरिकांची जास्तीत जास्त कामे कशी करता येतील याकडे प्राधान्याने लक्ष देउन काम करा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन मनपाचे स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले यांनी केले तर आभार धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी मानले. यावेळी झोनच्या चारही प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अमर बागडे
ज्या जनतेने विश्वासाने नगरसेवक म्हणून निवडून दिले त्याच जनतेच्या सेवेकरिता सभापतीपदाचा उपयोग करण्यात येईल. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची दिग्गजांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हे कर्तव्य आहे. नागरिकांच्या विश्वासामुळेच इथपर्यंत पोहोचता आले त्यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास नवनिर्वाचित झोन सभापती अमर बागडे यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा : नदी, नाले स्वच्छता अभियानाच्या कामाची स्थायी समिती सभापतींकडून पाहणी