नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या नदी व नाले स्वच्छता अभियानाच्या निर्धारित कालावधीमध्ये काही दिवस शिल्लक असून थोडे कामच शिल्लक असले तरी कामामध्ये कोणतिही हलगर्जी होउ नये यासाठी महापौर, उपमहापौर, आयुक्तांकडून वेळोवेळी दौरा करून पाहणी करण्यात येत आहे. मात्र या कामाला गांभीर्याने घेत प्रशासनाकडून दररोजच स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांच्याकडून विविध ठिकाणी पाहणी करून कामाचा आढावा घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत शनिवारी (ता.७) स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी पिवळी नदी स्वच्छता अभियानाच्या कामाची पाहणी केली.
यावेळी आरोग्य समिती सभापती मनोज चापले, नगरसेवक गोपीचंद कुमरे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शुक्रवारी (ता.६) झालेल्या आढावा बैठकीमध्ये विविध भागातील नदी व नाले स्वच्छतेसंदर्भात काही तक्रारी स्थायी समिती सभापतींपुढे मांडण्यात आल्या. या तक्रारींवर गांभीर्याने दखल घेत शनिवारी (ता.७) तातडीने संबंधित भागाचा दौरा करून स्थायी समिती सभापतींनी पाहणी केली व कामाबाबत आवश्यक निर्देश दिले. संतोषी नगर परिसरात असलेल्या नाल्यामध्ये हिरव्या वनस्पतीच्या साम्राज्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होउ शकतो अशी तक्रार शुक्रवार(ता.६)च्या बैठकीमध्ये करण्यात आली. याशिवाय इतर भागातीलही तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावर दखल घेत स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी तातडीने स्वच्छतेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
अधिक वाचा : रस्त्यांवरील खड्ड्यांसदर्भात तातडीने कार्यवाही करा