नागपूर : सालेकसा तालुक्यातील टेकाटोला ते मुरकुटडोह रस्त्यावरील पुलाखाली माओवाद्यांनी घातपाताचा कट रचून स्फोटके पेरून ठेवली होती. गुप्त माहितीवरून पोलिसांनी परिसरामध्ये शोध मोहीम राबवून माओवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावला. पुलाखाली पेरलेली स्फोटके पोलिसांनी जप्त केली आहे.
‘सालेकसा हद्दीत घातपात घडविण्यासाठी आयईडी पेरून ठेवला आहे,’ अशी माहिती पोलिस अधीक्षक विनिता साहू यांना मिळाली होती. त्यांनी आमगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी जालीदर नालकुल यांना परिसरात शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार ‘सी-६०’ पथक व बॉम्बशोधक व नाशक पथकासह सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशनदरम्यान, पोलिसांना टेकाटोला ते मुरकुटडोह क्रमांक ३ कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाखाली एक जर्मनचा डबा व काही दूरपर्यंत इलेक्ट्रीक वायर आढळले. या वरून बॉम्ब असल्याची खात्री झाली. पेरुन ठेवलेले बॉम्ब त्यांनी निकामी केले.
घटनास्थळी एक जर्मन डब्बा १० किलो क्षमतेचा असून, त्यामध्ये सिल्वर रंगाचा दाणेदार स्फोटकपदार्थ मिळून आला. त्यामध्ये खिळे व काचेचे तुकडे मिश्रित केलेले होते. एक नग जिलेटीन स्टीक सुपर पावर ९० सोलर १२५ ग्रॅम, एक नग इलेक्ट्रीक डेटानेटर, काळ्या रंगाचा १३५ फूट लांब वायर, व १७५ फूट लांब हिरव्या पांढऱ्या रंगाचा वायर असे, स्फोटसाहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
या कारवाईने बॉम्बशोधक व नाशक पथकाला यश आले असून, माओवाद्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी जालीदर नालकुल, देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, सालेकसाचे ठाणेदार राजकुमार डुणगे, सी-६० पथक सालेकसा व बीडीडीएस पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बजाविली. यापूर्वी महाराष्ट्र दिनी माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांबुडखेडा मार्गावरील लेंडारी पुलाखाली भीषण स्फोट घडविला होता. यामध्ये १५ जवानांचा मृत्यू झाला होता.
अधिक वाचा : ‘सत्ते पे सत्ता’चा रिमेक बनणार; मुख्य भूमिकेत शाहरुख ?