नागपूर : जळत्या चितेत उडी घेऊन ३४ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. अंगावर शहारे आणणारी ही थरारक घटना शनिवारी सायंकाळी जयताळा स्मशानघाट येथे घडली. महेश मारोतीराव कोटांगळे (३४), रा. रमाबाई आंबेडकरनगर जयताळा, असे मृताचे नाव आहे.
महेश हा खासगी काम करीत होता. तो मनोरुग्ण होता. महेश हा आई-वडील, मोठे भाऊ मुकूंदा व सत्यवान यांच्यासोबत राहात होता. महेश याच्यावर डॉ. तोटे यांच्याकडे उपचार सुरू होते. शनिवारी परिसरातील पार्वताबाई या वृद्धेचे निधन झाले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर जयताळा स्मशानघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे नातेवाइक गेले. याचवेळी महेश धावत आला आणि त्याने जळत्या चितेत उडी घेतली. येथे खेळत असलेल्या मुलांनी हे दृश्य बघितले. त्यांनी आरडा-ओरड केली. नागरिकांनी धाव घेतली. महेश याला काठीने बाहेर काढले. तोपर्यंत होरपळून महेश याचा मृत्यू झाला होता.
एका नागरिकाने महेश याचा भाऊ मुकूंदा यांना मोबाइलवर घटनेची माहिती दिली. मुकूंदा व त्यांचे अन्य नातेवाइक तेथे आले. तोपर्यंत एमआयडीसी पोलिस स्टशेनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्यासह पोलिसांचा ताफाही तेथे पोहोचला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक जीवलग घाटे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पहिलीच घटना
उपराजधानीत आत्महत्येची अशाप्रकरची ही पहिलीच घटना होय. या घटनेने परिसरातील नागरिक सुन्न झाले आहेत. घटना आठवली की त्यांच्या अंगार शहारे येतात. महेश हा गत तीन दिवसांपासून स्वमग्न राहात होता. तो असे काही करेल, असे वाटले नव्हते. चक्क जळत्या चितेत उडी घेईल याची तर कल्पनाही नव्हती, असे परिसरातील नागरिक सांगतात.
महेश काकाने उडी घेतली
परिसरातील मुले घाटाजवळ क्रिकेट खेळत होती. ते खळत असतानाच अचानक महेश याने पेटत्या चितेत उडी घेतली. मुले आरडाआरेड करीत तेथून पळायला लागली. महेश काकाने उडी घेतली, महेश काकाने चितेत उडी घेतली,असे म्हणत ते वस्तीत आले. नागरिक जमा झाले. महेश काकाने चितेत उडी घेतल्याचे मुलांनी नागरिकांना सांगितले. नागरिकांनी लगेच स्मशानघाटकडे धाव घेतली. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेचा मुलांच्या मनावर परिणाम झाला असून ते अद्याप धक्क्यात आहेत.
आत्महत्या करणाऱ्या घाटावरच अंत्यसंस्कार
ज्या घाटावरील पेटत्या चितेत उडी घेऊन महेश याने आत्महत्या केली, त्याच जयताळा स्मशान घाटावर रविवारी दुपारी महेश याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. महेश याच्या आत्महत्येने कोटांगळे कुटुबींयाना जबर धक्का बसला आहे.
अधिक वाचा : फिर चढ़ा पारा, 47 पर पहुंचा, नागपुर विदर्भ में टॉप पर