नागपूर : उपराजधानीत विविध ठिकाणी दोन पोलिस उपनिरीक्षकांवर हल्ला करण्यात आला. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. पहिली घटना अंबाझरीतील फुटाळा तलाव परिसरात घडली. राजेश गोपाल परतेकी (वय ४२, रा. जुना फुटाळा) व अतुल राजकुमार ढेंगे (वय ३२, रा.कुणबी मोहल्ला) हे दोघे फुटाळा तलाव परिसरात दारु पित होते. याचवेळी पोलिस उपनिरीक्षक एस. बी. जाधव व त्यांचे सहकाऱ्यांना गस्त घालत होते. पोलिसांना ते दारु पिताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या वाहनात बसून दोघांना घेऊन जाधव हे अंबाझरी पोलिस स्टेशनमध्ये येत होते. यादरम्यान दोघांनी वाहनातच दारु प्यायला सुरुवात केली. जाधव यांनी त्यांना हटकले. दोघांनी त्यांना शिविगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली. यात जाधव यांच्या हाताला जखमी झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
दुसरी घटना मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास लष्करीबागेतील आवळेबाबू चौकात घडली. पाचपावली पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी व त्यांचे सहकारी परिसरात नाकाबंदी करीत होते. आरजू पानीपत गोंडाणे (वय २९) व अंकुश पानीपत गोंडाणे (वय २३, दोन्ही रा. कुशीनगर) हे मोटरसायकलने जात होते. पोलिसांनी तपासणीसाठी दोघांना थांबविले. त्यामुळे दोघे संतापले. त्यांनी सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केला. अन्य पोलिसांनी लगेच त्यांना पकडले. याप्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून आरजू व अंकुशला अटक केली.
अधिक वाचा : नागपुरात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या