नागपूर : प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये तैनात पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी एमआयडीसीतील गेडाम ले-आऊट भागात उघडकीस आली. विकास निळकंठ गुडधे (वय ४५), असे मृताचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत असले तरी कामाच्या तणावातून व वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा पोलिस विभागात आहे.
निळकंठ आधी लष्करात होते. सेवानिवृत्तीनंतर ते शहर पोलिस दलात दाखल झाले. तीन वर्षांपूर्वी त्यांची प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये नियुक्ती करण्यात आली. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास विकास घरी आले. यावेळी त्यांची आई व भाऊ घरी होते. त्यांच्या पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. यादरम्यान विकास यांनी त्यांच्या खोलीत पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पत्नी घरी आल्या असता ही घटना उघडकीस आली. त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली. विकास यांची आई व भाऊ खोलीत आले. विकास यांच्या भावाने एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
अधिक वाचा : कर्तव्यदक्ष चालक आणि वाहकाचा परिवहन समिती मनपातर्फे सन्मान, प्रसंगावधानाने वाचविला १५ प्रवाशांचा जीव