नागपुरात उष्माघाताचे १० बळी

Date:

नागपूर : नागपुरातील उष्णतेच्या या लाटेत गेल्या ४८ तासांत दहा जणांचा जीव गेला आहे. ते उष्माघाताचे बळी ठरले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून विदर्भात सूर्य आग ओकत आहे. नागपुरात तर दरदिवशी मोसमातील उच्चांक बदलत आहे. मंगळवारी उपराजधानीत ४७.५ अंश सेल्सिअस इतके इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले.

शहरात दहा विविध ठिकाणी दहा जणांचे मृतदेह आढळले. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॉटन मार्केट येथे, रामझुल्याखाली तसेच अशोक चौकातील फुटपाथवर, कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एम्पायर ट्रान्सपोर्ट कॅरियर दुकानाच्या पायरीवर, सक्करदरा उडाणपुलाखाली, हनुमान मंदिर परिसरातील भोसले जिमसमोर, मोठा ताजबागेतील बुलंद गेटसमोर, धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केअर हॉस्पिटल समोरील शहीद उड्डाण पुलाखाली, सिव्हिल लाइन्स परिसरातील आयजी ऑफिसच्या कुंपणाजवळील फुटपाथवर, सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रयास अॅकॅडमीच्या प्रवेशद्वाराच्या बाजूच्या पॅसेजमध्ये अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळले आहेत.

विदर्भात यंदा एप्रिल महिन्याच्या अखेरीसच उन्हाचा कडाका सुरू झाला होता. एप्रिल महिन्याअखेरीसच तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे तेव्हापासूनच उष्माघाताच्या बळींना सुरुवात झाली. गेल्या दोन आठवड्यात किमान २५ अनोळखी व्यक्तींचे मृतदेह रस्त्यावर आढळले आहेत.

तीव्र उन्हासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरात सर्वाधिक ४७.८ इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. उष्णतेची ही तीव्र लाट पुढील दोन राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा नागपूर सर्वाधिक ४७.९ अंश सेल्सिअसचा विक्रम मोडणार का याकडे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा : मोदींचा शपथविधी : शाही जेवण, ६००० पाहुणे आणि बरंच काही

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related