नागपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आज अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा सादर केला मात्र कार्यकारिणीने हा राजीनामा एकमताने फेटाळून लावला. काँग्रेससाठी हा आव्हानात्मक काळ आहे आणि अशावेळी आपल्या नेतृत्वाची पक्षाला नितांत गरज आहे, असे नमूद करत राहुल यांनीच पक्षाध्यक्षपदी कायम राहावे, असा आग्रह कार्यकारिणीने केला.
कार्यकारिणीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली. देशातील जनतेने जो कौल दिला आहे त्याचा काँग्रेस आदर करत आहे. पक्षावर देशातील १२ कोटीपेक्षाही अधिक मतदारांनी विश्वास व्यक्त केला असून त्यांचे आम्ही आभार मानत आहोत, असे सुरजेवाला पुढे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर आज चिंतन करण्यात आलं. त्याअंती पक्षाच्या रचनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यावर एकमत झालं असून त्याचे सर्वाधिकार राहुल यांच्याकडे देण्याचा निर्णय कार्यकारिणीत घेण्यात आल्याचेही सुरजेवाला यांनी सांगितले. संसदेत एक सकारात्मक व जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका आम्ही निभावू, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
बैठकीत काय घडलं ?
लोकसभा निवडणुका पक्षाने माझ्या नेतृत्वाखाली लढल्या. त्यामुळे या पराभवास मीच जबाबदार असून त्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे राहुल यांनी बैठकीत सांगितले. त्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी राहुल यांची मनधरणी केली व राजीनामा मागे घेण्याचा आग्रह धरला. विशेषत: मनमोहन यांनी राहुल यांना राजीनाम्याचा आपण विचारच करू नये, असे सांगितले. निवडणुकीत हार-जीत ही असतेच पण त्यापुढे जाऊन पक्षाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे. आपल्याशिवाय पक्षाकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, असे मनमोहन यांनी सांगितले. इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांनाही पराभव पाहावा लागला होता मात्र, त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षाने पुन्हा यश पाहिलं, असा दाखलाही मनमोहन यांनी दिला.
अधिक वाचा : AICTE reduces direct quota for diploma students