नागपूर : मौज मजेसाठी मोटारसायकलची चोरी करणाऱ्या अल्पवयीन तरुणास गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून शुक्रवारी अटक केली. या अल्पवयीन मुलाने शहरातून सहा मोटारसायलची चोरी केली होती. त्या सगळ्या दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
मानेवाडा येथील पराग अशोक उतलेवार हे काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने इसासनी भागातील लता मंगेशकर रुग्णालयात गेले होते. पार्किंगमध्ये गाडी लावून ते कामाला गेले असता एका अल्पवयीन चोरट्याने त्यांची एम. एच. ३१-बी डब्ल्यू ७३०९ ही दुचाकी चोरून नेली. याबाबत पराग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. या घडामोडीत अशाच क्रमांकाची एक दुचाकी हिंगणा एमआयडीसीच्या गस्त पथकाला दिसली. त्यांनी अल्पवयीन मुलावर पाळत ठेवून त्याचा पाठलाग करीत त्याला ताब्यात घेतले.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता मुलाने शहरातून आणखी मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले. मौजमजेसाठी हा अल्पवयीन मुलगा चोरलेल्या मोटारसायकल तो एमआयडीसी परिसरात लपवून ठेवत असल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून एक लाल रंगाची पल्सर, टिव्हिएस स्टार मोपेड, एक हिरोहोंडा स्प्लेंडर अशा सहा दुचाकी जप्त केल्या. या कारवाईसाठी पोलिस निरीक्षक संतोष खांडेक, सहाय्यक पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, प्रशांत चौगुले, राजकुमार देशमुख, श्रीनिवास मिश्रा, वसंता चौरे, सुनिल चौधरी, नरेश रेवतकर, सुरेश ठाकूर, रवींद्र बाराई, राजेश डेनगुरिया, राहुल इंगोले, मंगेश मडावी आदींनी सहकार्य केले.
अधिक वाचा : मोदी सरकारचा शपथविधी ३० मे रोजी