नागपूर : लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झालं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील पराभवाची जबाबदारी घेत अभिनेते राज बब्बर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. बब्बर यांच्यापाठोपाठ ओडिशाचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला दणदणीत यश मिळाल्यानं काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अनेक राज्यांमध्ये तर काँग्रेसला खातंही खोलता आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून त्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.
देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला आहे. स्वत: राज बब्बर हे सुद्धा फतेहपूर सिक्रीतून पराभूत झाले आहेत. भाजप उमेदवार राजकुमार चाहर यांनी बब्बर यांचा तीन लाखाच्या मताधिक्याने पराभव केला आहे.
राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अमेठीचे जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीही जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे त्यांचा राजीनामा सादर केला आहे.
अधिक वाचा : केंद्रात जलशक्ती मंत्रालय स्थापन करणार