नागपूर : लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा संपल्यानंतर पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातील चार महानगरे तसेच, अन्य शहरांत पेट्रोल व डिझेलच्या दरांत सोमवारी प्रतिलिटर अनुक्रमे ९ व १६ पैशांची वाढ झाली. यामुळे मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर ७६.७३ रुपयांवर पोहोचला. तर, डिझेलच्या दराने ६९.२७ रुपये प्रतिलिटरचा स्तर गाठला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी इंधन कंपन्यांनी इंधन दरवाढ टाळली होती. उलटपक्षी, गेल्या १० दिवसांत पेट्रोलचे दर १.८० रुपयांनी तर, डिझेलचे दर ६३ पैशांनी कमी झाले होते. मात्र या दरांनी आता विरूद्ध दिशेने प्रवास सुरू केल्याचे दिसत आहे. इंधन निर्यातदार देशांनी (ओपेक) इंधन पुरवठ्यात आखडता हात घेतल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या दरांत काही दिवसांपासून सतत वाढ होत आहे. अशातच अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादून सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्याने भारतासह काही देशांना इराणकडून होणारी इंधनआयात शून्यावर आणावी लागली आहे. यामुळे कच्च्या इंधनाच्या दरावर मोठा दबाव असून त्याचे दर सतत चढेच राहिले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे दर सोमवारी प्रतिबॅरल ७२ अमेरिकी डॉलरवर पोहोचले. हे दर काही दिवसांपूर्वी ६९ अमेरिकी डॉलर होते. मात्र अमेरिका व इराणमधील तणाव निवळण्याची चिन्हे नसल्याने तसेच, ओपेक देशांकडून पुरेसा इंधनपुरवठा होत नसल्याने येत्या काही दिवसांत कच्च्या इंधनाचे दर प्रतिबॅरल ९० अमेरिकी डॉलरपर्यंत उसळी घेतील, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतासारख्या देशांवर याचा थेट परिणाम होणार असून देशांतर्गत पेट्रोल व डिझेल दरात आणखी भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे.
अधिक वाचा : नागपूरात युवा अभियंत्याचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा