नागपूर : युवा अभियंता नवीन छगन श्रीराव (रा. रेणुकामातानगर) याच्या मृत्युप्रकरणी अजनी पोलिसांनी कंत्राटदार, प्रशिक्षकासह सात जणांविरुद्ध निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कंत्राटदार दिलीप पुरुषोत्तम हेलचेल (रा. हनुमाननगर), प्रशिक्षक दिगांबर मारबते, मनीष बावणे, उदाराम पेंदाम, निखिल बांते, अजिंक्य घायवट व विधिसंघर्षग्रस्त बालक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
२१ एप्रिलला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून नवीनचा मृत्यू झाला. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. एका तुकडीत ३० जणांना स्विमिंग पूलमध्ये सरावाची व्यवस्था असतानाही पूलमध्ये तब्बल ५६ जणांना उतरविण्यात आले होते. नवीन हा प्रशिक्षणार्थी होता. तो बुडत असताना कंत्राटदार व प्रशिक्षकाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नवीन याचा मृत्यू झाल्याचे तपासादरम्यान समोर आले.
निष्काळजीपणा, बेजाबदारपणामुळे नवीनचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी नवीन याचे वडील छगन श्रीराव यांनी अनेकदा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती.
अधिक वाचा : कुख्यात पवन मोरयानीला सिनेस्टाइल अटक