नागपूर : शिकवणी वर्ग आणि ज्युनिअर कॉलेजेस टायअप करून अकराव्या वर्गाचे प्रवेश करीत असतात. असे प्रकार टाळण्यासाठी आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून अकरावी प्रवेशप्रक्रिया ही नागपूर मेट्रो रिजन परिसरात राबविली जावी, अशी मागणी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनने केली आहे.
नागपूर शहरातील विविध ज्युनिअर कॉलेजेसमधील प्रवेशांसाठी मागील तीन वर्षांपासून ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते आहे. हायकोर्टाच्या आदेशांनंतर संपूर्ण राज्यभरात ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षी अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत झालेल्या गोंधळासंदर्भात विज्युक्टाने विविध मुद्दे उपस्थित केले आहेत.
अकरावी प्रवेशप्रक्रिया ही सध्या नागपूर शहराच्या हद्दीत राबविली जाते. त्यातून पळवाट काढण्यासाठी शिकवणी वर्गाचे चालक आपल्या विद्यार्थ्यांना शहरालगतच्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घ्यायला लावतात. कॉलेजेस आणि शिकवणी वर्ग यांच्या टायअपमधून हे प्रकार घडतात. अशा प्रकारची ‘दुकानदारी’ टाळण्यासाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया नागपूर मेट्रो रिजनमध्ये राबविली जावी, असे विज्युक्टाने म्हटले आहे.
अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या ऑनलाइन मार्गदर्शक पुस्तिकेत ज्युनिअर कॉलेजेसची नावे आणि सांकेतिक क्रमांक द्यावा. सर्व कॉलेजेसमधील मागील वर्षाच्या कट ऑफ पॉइंटसुद्धा दिला जावा. यामुळे, विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी कॉलेज निवडताना अडचणी होणार नाही. मागील वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत मार्गदर्शक पुस्तिकेतून कॉलेजेसची नावे आणि सांकेतिक क्रमांक काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा कॉलेजेसची नावे आणि सांकेतिक क्रमांक मार्गदर्शक पुस्तिकेत देण्यात यावे, असे विज्युक्टाने म्हटले आहे.
विज्युक्टाचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांच्या नेतृत्वात संघटनेच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना या संदर्भात निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. विलास केरडे, कोषाध्यक्ष प्रा. अभिजित पोटले, शहराध्यक्ष प्रा. मनीष तंबाखे, शहर उपाध्यक्ष डॉ. गोविंदा चौधरी तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
विज्युक्टाच्या अन्य मागण्या
– २०१९-२० मधील प्रवेशप्रक्रिया ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी. मागील वर्षी ती ऑक्टोबरपर्यंत लांबली होती.
– प्रवेशप्रक्रिया बंद करून शाळास्तरावर प्रवेश करू द्या.
– मागील सत्राच्या खर्चाचे हिशेब यंदाच्या मार्गदर्शक पुस्तिकेत द्या.
– पूर्वीची केंद्र समिती रद्द करून नवीन समिती निवडा.
– ज्युनिअर कॉलेजेसमध्ये काम करणारे व्यक्तीच समितीत घ्यावे.
– विनाअनुदानित स्वयंअर्थसहायित कॉलेजेसमध्ये होणारा घोळ थांबवावा.
अधिक वाचा : २२०० लिटर स्पिरीट जप्त