नागपूर : आवडीचे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे टीव्ही चॅनलचे पर्याय न भरता केबल ऑपरेटरने ठरवून दिलेल्या पॅकेजचा भडीमार ग्राहकांवर करण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांपासून याबाबत ग्राहकांनी तक्रार करूनही मल्टिसर्व्हिस ऑपरेटर (एमएसओ) दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक कोंडी होत असल्याचे चित्र शहरातील बहुतांश वस्त्यांमध्ये आहे.
केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) जाहीर केलेल्या निर्णयानुसार डीटीएच (डायरेक्ट टू होम) कंपन्या आणि केबल नेटवर्कद्वारे देण्यात येणारे पॅकेज स्वीकारणे ग्राहकांना बंधनकारक नाही. पण, प्रत्यक्ष तसे चित्र नसल्याचे दिसून येत आहे. केबल ऑपरेटरने स्वत:चे पॅकेज तयार केले आहेत. त्या पॅकेजचे पर्याय असलेले फॉर्म ग्राहकांना देण्यात आले आहेत. त्यात उपलब्ध असलेल्या पॅकेजची निवड करणे ग्राहकांना अनिवार्य झाले आहे. मागील दोन महिन्यांमध्ये अनेक ग्राहकांना पर्याय न निवडल्यामुळे आवडत्या चॅनेलला मुकावे लागले आहे. यासंदर्भात ग्राहकांनी तक्रार केली आहे. दर्शनी कॉलनी येथील अशोक कुबडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ट्रायच्या निर्णयापूर्वी त्यांना २५० रुपये केबल कनेक्शनसाठी मोजावे लागत होते. आता गरज नसलेल्या चॅनलसाठी ३७० रुपये भरावे लागत आहे. डुबके यांच्याकडे यूसीएनचे कनेक्शन आहे. त्यांच्या केबल ऑपरेटरने कुठल्याही प्रकारचे पर्याय न देता केवळ तीन प्रकारचे पॅकेज थोपविले आहेत. ज्यामध्ये गरज नसलेल्या इंग्लिश चॅनलचादेखील समावेश आहे. शिवाय कुठलेही स्वतंत्र चॅनल न पुरविता चॅनलचे बुके घेण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. डुबके यांच्याप्रमाणेच शहरातील विविध भागातील केबल ऑपरेटर्सनी स्वत:चे पॅकेज लादण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे विनाकारण ग्राहकांना गरज नसलेल्या चॅनलचे पैसे भरावे लागत आहे. सध्या ग्राहकांना डिश टीव्ही अथवा केबलवर गरज नसताना पाहाव्या लागणाऱ्या चॅनलच्या पॅकेजची किंमत किमान ४०० ते ६५० रुपयांच्या घरात जात आहे. त्यातील अनेक चॅनेल्स पाहिले जात नाहीत. त्यामुळे, हवे ते चॅनेल घेता येणार असल्याचा ट्रायचा दावा फसवा ठरला आहे.
महाराष्ट्रात आणि शहरात प्रामुख्याने मराठी बातम्या, करमणूक, चित्रपट वाहिन्या, हिंदी-मराठी बातम्या, चित्रपट आणि स्पोर्ट्स चॅनेल्स मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात. यातील बरेचसे चॅनल्स विशेषत: स्पोर्ट्स आणि मराठी चॅनल्स लोकप्रिय आहेत. पण या चॅनल्ससोबत इतरांचा होणारा भडीमार कशाला, असा सवाल उपस्थित होत आहे.
मराठी वाहिन्यांचे चॅनल आम्हाला हवे आहे. पण, केबल ऑपरेटरने आमच्यावर स्वत:चे पॅकेज लादले आहे. त्यामुळे अनावश्यकरित्या इंग्लिश चॅनलचे शुल्क भरावे लागत आहे. यामध्ये ग्राहकांचे चॅनल निवडीचे स्वातंत्र्य कुठेही राहीलेले नाही.
अधिक वाचा : कुटुंबाशिवायही महिला करू शकतील ‘हज’