नागपूर : ‘शरद पवारांनी बारामतीत बऱ्यापैकी काम केलं आहे. बारामतीत पराभवाची त्यांची भीती मला खरी वाटत नाही. तिथं सुप्रिया सुळे पराभूत होणार नाहीत,’ असा अंदाज वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज व्यक्त केला.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव झाल्यास ईव्हीएममधील फेरफारामुळंच होऊ शकतो, असं वक्तव्य शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावरून बारामतीच्या निकालाबद्दल त्यांच्या मनात धाकधूक असल्याची चर्चा होती. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र पवारांची ही भीती अनाठायी असल्याचं सांगितलं. बारामतीत पवारांचं काम चांगलं आहे, असं ते म्हणाले. मात्र, अन्य मुद्द्यांवरून त्यांनी पवारांवर जोरदार टीका केली.
पवारांच्या दुष्काळी दौऱ्यावरही त्यांनी तोफ डागली. ‘दुष्काळी भागाचा दौरा मी देखील केला, पण त्याचं मार्केटिंग केलं नाही. मेलेल्या टाळूवरचे लोणी खायची मला सवय नाही. ५० वर्षे ज्यांनी पाणी चोरले, ते आता दुष्काळावर बोलतात,’ असा टोला आंबेडकरांनी हाणला.
मोदींचं मानसिक संतुलन बिघडलंय !
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मानसिक संतुलन बिघडलंय. अशा मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला जनतेनं पुन्हा पंतप्रधान करू नये. त्यांचे खासदार निवडून येणार नाही, याची दक्षता लोकांनी घेतली पाहिजे,’ असं आवाहनही आंबेडकरांनी केलं.
अधिक वाचा : IPL : मुंबईकडून दोन पराभव हा भूतकाळ – हरभजन